मुंबईतील चार तर देशातील ६० स्थानके

देशातील महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि प्रवाशांच्या तक्रारींची तड तातडीने लागावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता देशातील ६० स्थानकांवर स्थानक संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकांची जबाबदारी स्थानक अधीक्षकांवर आहे. स्थानक संचालक या पदासाठी ‘अ’ श्रेणीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याने या अधिकाऱ्यांकडे स्थानक अधीक्षकापेक्षा जास्त अधिकार असतील. तसेच हे अधिकारी थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अमलाखाली असल्याने या महत्त्वाच्या स्थानकांची दखल उच्च स्तरावर घेतली जाईल. या ६० स्थानकांमध्ये मुंबईतील चार प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वे स्थानकांची जबाबदारी मुख्य स्थानक अधीक्षकांकडे असते. या पदी कनिष्ठ बढती अधिकाऱ्यांची नेमणूक होते. हे अधिकारी ‘अ’ श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणजेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे मुख्य स्थानक अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांचे अधिकार मर्यादीत असतात. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती.

आता देशातल्या प्रमुख स्थानकांवर स्थानक अधीक्षकांऐवजी स्थानक संचालक नेमल्यास त्या संचालकांच्या हाती जादा अधिकार येतील. त्यामुळे या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये आवश्यक असलेल्या प्रवासी सुविधांसाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया लवकर होईल. स्थानकावरील इतर अधिकारी स्थानक संचालकापेक्षा कनिष्ठ श्रेणीचे असल्याने ते स्थानक संचालकाच्या नियंत्रणाखाली काम करतील. तसेच हे स्थानक संचालक थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदावरील अधिकाऱ्याशी जोडले असल्याने या स्थानकांना महत्त्व प्राप्त होणार आहे.

या स्थानकांमध्ये मुंबईतील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल या दोन महत्त्वाच्या स्थानकांसह आणखी दोन स्थानकांचा समावेश असल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.