स्वमग्नतेसारख्या (ऑटिझम) मनोविकारांमध्ये ‘स्टेम सेल थेरपी’चा वापर करणे अद्यापही वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध झालेले नाही, असे भारतीय मानसशास्त्र संस्थेने (आयपीएस) स्पष्ट केले आहे. या थेरपीच्या वापराविरोधात संस्थेने पत्राद्वारे तीव्र निषेधही व्यक्त केला आहे.

स्वमग्नता किंवा अन्य मनोविकार हे मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्थेतील आहेत. ही अवस्था कोणत्या कारणांमुळे निर्माण होते, याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. ‘स्टेमसेल थेरपी’ने काही आजार बरे होत असतील असे खरे मानले तरी मनोविकार बरे होत असल्याचे वैज्ञानिक पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या उपचारतंत्राचा वापर मनोविकारांसाठी करणे फायदेशीर असल्याचे कोणत्याही संशोधनात्मक पुराव्यांमधूनही सिद्ध झालेले नाही, असे ‘आयपीएस’ने या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

‘स्टेम सेल’ उपचाराबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही स्वमग्नतेसह मनोविकारांमध्ये या उपचारतंत्राच्या वापराबाबत सूचित केलेले नाही. तेव्हा कोणतेही वैज्ञानिक पुरावे हाती येईपर्यत या उपचारतंत्राच्या वापराविरोधात निषेध असल्याचे आयपीएसने नमूद केले आहे.

आयपीएसच्या या भूमिकेचे मनोविकारतज्ज्ञांनी स्वागत केले असून संस्थेने उशिरा का होईना भूमिका घेतली असली तरी या विरोधात कोणतेही ठोस पाऊल मात्र उचलले नसल्याने नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

पालकांचे शोषण करणारे रॅकेट

‘स्टेम सेल थेरपी’ने बरा झालेला एकही मनोरुग्ण मी अद्याप पाहिलेला नाही. ही वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध न झालेली थेरपी असून जैववैद्यकीय विकसित तंत्रज्ञान या नावाखाली पालकांचे शोषण करणारे रॅकेट मोठय़ा पातळीवर कार्यरत आहे. सुमारे पाच लाखांपासून ते अगदी ४० लाखांपर्यंत खर्च असलेल्या थेरपीमधून पालकांची लुबाडणूक तर होतेच, शिवाय त्यांच्या भावनांशीही खेळ केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलनाप्रमाणे या फसव्या थेरपींबाबत लोकांना सज्ञान करणे आवश्यक आहे. अवैध कारभारावर वैद्यकीय यंत्रणेचेही र्निबध नसल्याने यांच्यावर अंकुश कोण आणणार, असा प्रश्न मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

आपला पाल्य स्वमग्न असल्याचे समजल्यानंतर पालक खचून जातात. बऱ्याच ठिकाणी उपाय करून हतबल झालेल्या पालकांना ‘स्टेम सेल’च्या नावाखाली १०० टक्के  बरे करण्याची खोटी आशा दाखविली जाते. पालकही याला भुलून लाखो रुपये खर्च करतात. जाहिरातबाजीमुळे अनेक पालक ही थेरपी करू का अशी विचारणाही करतात. पालकांनी या दाव्यांना भुलून न जाता पाल्याच्या या अवस्थेचा स्वीकार करावा. मानसिक आणि सामाजिक उपयुक्त उपचार, समुपदेशन यावर भर दिल्यास पाल्यामध्ये नक्कीच काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते

– डॉ. आशीष देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ