आपल्या घटस्फोटित पत्नीच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या एका मेकॅनिकला जे. जे. मार्ग पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. या व्यक्तीने या लहान मुलाला त्याच्या घराजवळ सुखरूप सोडले होते. मात्र अपहरण आणि धमकी दिल्याबद्दल पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
भेंडीबाजारातील पठाणवाडीत राहणारा इम्रान शेख मोटर मेकॅनिक म्हणून काम करत होता. तिथेच झोपडीत राहणाऱ्या जरिना शेख हिच्याबरोबर तीन वर्षांपूर्वी त्याचे सूत जुळले होते. जरिना घटस्फोटित होती आणि तिला सुलेमान नावाचा मुलगा होता. या दोघांनी २००९मध्ये निकाह केला. मात्र इम्रानच्या घरच्यांना हा निकाह मंजूर नसल्याने इम्रानने जरिनाला एका वर्षांनंतर घटस्फोट दिला.
मात्र गेल्या काही दिवसांपासून इम्रान आणि जरिना एकमेकांच्या संपर्कात आले होते. इम्रानने तिच्याकडे पूर्वीचेच संबंध प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र जरिनाने त्याला नकार दिला. या नकाराचा राग मनात ठेवून इम्रानने २४ सप्टेंबर रोजी जरिनाच्या मुलाचे, सुलतानचे अपहरण केले. माझ्याबरोबर पुन्हा संबंध ठेव, नाही तर सुलतानचा चेहरा अ‍ॅसिड टाकून विद्रूप करेन, अशी धमकीही सुलतानने जरिनाला दिली. घाबरलेल्या जरिनाने ताबडतोब जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत इम्रानविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी इम्रानचा शोध घेण्यासाठी त्याचा मोबाइल ट्रॅक करायला सुरुवात केली. इम्रानला ही कुणकुण लागल्यानंतर घाबरून त्याने गुरुवारी सकाळी सुलतानला पुन्हा त्याच्या घराजवळ सोडले. जरिनाने याबाबत पोलिसांना त्वरित माहिती दिली. मग पोलिसांनी इम्रानला पकडण्यासाठी जरिनाच्या मदतीने सापळा रचला.
जरिनाने इम्रानला फोन करून आपण पुन्हा एकत्र राहू या, असे सांगितले. तिने त्याला भेटायलाही बोलावले. इम्रानने जरिनाला फोन करून मांडवी येथे भेटण्यास बोलावले. पोलिसांनी मांडवी येथे सापळा लावून इम्रानला अटक केली.