सदाशिव अमरापूरकर यांना धक्काबुक्की प्रकरण
ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना धुळवडीच्या दिवशी धक्काबुक्की करून गोंधळ घालणाऱ्या वर्सोवा येथील एका सोसायटीतील रहिवाशांविरुद्ध पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी धुळवडीच्या दिवशी, बुधवारीच तक्रार दाखल करण्यात आली होती. धक्काबुक्की करणाऱ्या आरोपींवर कागदोपत्री गुन्हा दाखल झाला असला, तरी त्यांची ओळख अद्याप न पटल्याने पुढील कारवाई न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वर्सोवा यारी रोड येथील पंचवटी सोसायटीतील रहिवाशांनी धुळवडीच्या दिवशी रेन डान्सच्या नावाखाली हजारो लीटर पाणी वाया घालवले. त्याचबरोबर चार ते पाच तास कानठळ्या बसवणारा ‘डीजे’ही लावला होता. या लोकांना, आवाज करू नका, असे समजावण्यासाठी गेलेल्या सदाशिव अमरापूरकर यांना या वेळी रहिवाशांपैकी काहींनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली होती. त्याचप्रमाणे अमरापूरकर यांच्यासह असलेल्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांनाही मारहाण करण्यात आली.
या प्रसंगी अमरापूरकर यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई न केल्याचे अमरापूरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वास्तविक पोलिसांनी या समाजकंटकांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे आमच्याकडे घडलेल्या प्रसंगाचे चित्रीकरणही होते. तेही पोलिसांनी पाहणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी यापैकी काहीच केलेले नाही, असे अमरापूरकर म्हणाले.
याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे यांनी दिली. अमरापूरकर यांना धक्काबुक्की करणारे निश्चित आरोपी कळलेले नाहीत. पुढील दोन ते तीन दिवसांत संबंधित आरोपींवर कारवाई होईल, असे पिंपळे यांनी स्पष्ट केले.