* दहा महिन्यांत १४ घटनांची नोंद
* तपास मात्र एकाच प्रकरणाचा
* विजेच्या खांब्यावर कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव

उपनगरीय रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलवर भिरकावण्यात येणाऱ्या दगडफेकींची प्रकरणे जलद मार्गावर असताना तपास मात्र धीम्यामार्गावर असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यांत लोकलच्या प्रवाशांवर दगडफेकीच्या १४ घटना घडल्या असून त्यातील अवघ्या एका प्रकरणाचा तपास लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. मात्र दगडफेक रोखण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी विजेच्या खांब्यांवर कॅमेरे बसवण्याचा मानस असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या दहा महिन्यांत वाशी, कुर्ला, ठाणे, कल्याण, वडाळा, दादर, किंग्ज सर्कल आदीं स्थानकांदरम्यान लोकलवर दगडफेकीच्या १४ घटना घडल्या आहेत. यात केवळ हार्बर मार्गावरील वडाळा येथे झालेल्या दडगफेक प्रकरणी आरोपीला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, रेल्वेच्या रुळालगत वाढत्या झोपडपटय़ा, रेल्वेमार्गाच्या हद्दीबाहेरून केली जाणारी दगडफेक आणि पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ या तांत्रिक अडचणींमुळे लोकलवर दगडफेकीच्या प्रकरणाचा उलगडा कमी प्रमाणात होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बहुतेक वेळा लोकलवर भिरकवण्यात येणारा दगड रेल्वे हद्दीच्या बाहेरून येत असतो. त्यामुळे त्यांचा तपास करणे कठीण होऊन बसते. शिवाय धावत्या लोकलमधून एखाद्या प्रवाशाने दगड फेकणाऱ्या व्यक्तीला बघितल्यास अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्याला पकडणे अशक्य होऊन बसते. यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे लहान मुलं केवळ ‘मज्जा, मस्ती’ म्हणून लोकलवर दगड भिरकवतात. त्यामुळे कारवाई करताना अडचणी निर्माण होत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईच्या लाइफलाइनने रोज लाखों प्रवासी प्रवास करतात. यात सोयीसुविधांचा अभाव त्यात जीवघेणी गर्दी तर सदानकाळ होणारे तांत्रिक बिघाड यांमुळे प्रवासी आधीच त्रस्त असतात. त्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षा यंत्रणाही अपयशी ठरत असतील तर ही चिंताजनक बाब असल्याची टीका यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली.

दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोहमार्ग पोलीस दलासह रेल्वे सुरक्षा दल, मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलिसांची मदत घेतली जात आहे. सातत्याने रुळांभोवती गस्त वाढवली जात आहे. नवीन उपाययोजना आखल्या जात आहेत. याशिवाय रेल्वेमार्गावरील रुळालगतच्या विजेच्या खांब्यांवर अत्याधुनिक कॅमेरे( रँडल लुक) बसवण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याविषयी सांगायचे झाल्यास, हे कॅमेरे विजेच्या खांब्यांची वीज वापरून चालवण्यात येणार असून दगड बसल्यास हे कॅमेरे फुटणार नाहीत. त्याचप्रमाणे केवळ कारवाई न करता स्थानिकांमध्ये दगडफेड रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. येणाऱ्या काळात हे प्रमाण नक्कीच कमी होईल.
– मधुकर पाण्डय़े,
आयुक्त, रेल्वे पोलीस