ई चलनद्वारे केलेल्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांची प्रकरणे उच्च न्यायालयात नेण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. आठवडाभरात १०,५०० चालकांना लघुसंदेश धाडून पुढील कठोर कारवाईबाबत सूचित करण्यात आले आहे. पोलिसांच्या या इशाऱ्यानंतर अनेक वाहनचालकांनी दंड भरण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

नियम मोडणाऱ्या चालकांवर ई चलन प्रणालीत दंड भरण्याची सक्ती केली जात नाही. वाहन, वाहनाची कागदपत्रे किंवा परवाना जप्त केला जात नाही. त्यामुळे ई चलनद्वारे बजावण्यात आलेला दंड भरण्याबाबत चालक गंभीर नाहीत. परिणामी ही प्रणाली लागू झाल्यानंतर नियम मोडणाऱ्यांना चलन पाठविण्याचे प्रमाण वाढले. परंतु, ई चलन आणि वसूल होणारा दंड याचे प्रमाण कायम व्यस्त राहिले.

या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत चालकांना न्यायालयीन कारवाईचे इशारे देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडय़ात ज्या वाहनांवर पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेचा दंड भरणे बाकी आहे अशा वाहनांच्या मालकांना पोलिसांनी लघुसंदेश धाडले. यात १५ नोव्हेंबपर्यंत दंड न भरल्यास प्रकरणे न्यायालयात नेली जातील, असे सांगण्यात आले. प्रकरण न्यायालयात गेल्यास संबंधित प्रकरणात किती दंड वसूल करावा (तडजोड) वा मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारावासाची शिक्षा करावी, हा निर्णय न्यायालयाद्वारे घेतला जाईल, असे पोलिसांकडून कळवण्यात येत आहे.

हे लघुसंदेश प्राप्त होताच ई चलन भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाच हजार किंवा त्याहून जास्त दंड प्रलंबित असलेल्या १०,५०० चालकांना लघुसंदेश धाडून पुढील कठोर कारवाईबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानंतर दंड वसुलीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे ते म्हणाले. जांच्याकडे प्रलंबित दंडाची रक्कम २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशी प्रकरणे न्यायालयात पाठविण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.