परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकांची कबुली; दिरंगाईला आणखी एका प्रकाराची जोड

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर असल्याचा शेरा मारूनच निकाल राखीव ठेवणे शक्य होत असल्याने बहुतांश विद्यार्थी पेपरला हजर असूनही गैरहजर असल्याचे दाखवण्यात आले आहे, अशी कबुली खुद्द परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी दिली आहे. या तांत्रिक अडचणीबाबत मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना कोणतीच सूचना न मिळाल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना थेट हजेरीचे पुरावे गोळा करण्यास पाठविले आहे. विद्यापीठाच्या या तांत्रिक घोटाळ्यामुळे मात्र अनेक विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव यांनी निकालरखडपट्टीमुळे मुंबई विद्यापीठाला धारेवर धरत सर्व पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची मुदत दिली होती. परंतु ही मुदत पाळू न शकणाऱ्या विद्यापीठाने दोन वेगवेगळ्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवत कला आणि विज्ञान शाखेचे बहुतांश निकाल जाहीर केले. पहिल्या पद्धतीनुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल नंतर जाहीर करण्यात येतील, अशी सूचना संकेतस्थळावर दाखविण्यात आली. तर दुसऱ्या पद्धतीनुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या एखाद्या विषयाचे मूल्यांकन बाकी आहे किंवा एखाद्या विषयाच्या निकालाची जुळवाजुळव करण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांना निकाल राखीव ठेवला असल्याची सूचना संकेतस्थळावर दाखविण्यात आली आहे.

परीक्षाभवनातील अधिकाऱ्यांना सदर तांत्रिक अडचणींची कोणतीही कल्पना नसल्याने अशी तक्रार घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हजर असल्याचे पुरावे आणण्यासाठी संबंधित परीक्षाकेंद्रावर पाठविले गेले. परंतु शनिवारनंतर सदर तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेऊन यासंबंधी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी चौकशी केली. तेव्हा तांत्रिक अडचणीमुळे हजर-गैरहजरचा गोंधळ झाल्याचे लक्षात आले आहे.

‘विद्यापीठाच्या निकाल प्रक्षेपित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने निकाल राखीव ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ज्या विषयांचा निकाल तयार नाही त्या विषयामध्ये गैरहजर दाखविण्याचा एकच पर्याय उपलब्ध आहे. तंत्रज्ञानातील या अडचणीमुळे आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची वेळ विद्यापीठावर प्रथमच आली आहे. त्यामुळे राखीव निकालाबाबत परीक्षाभवनातील कर्मचाऱ्यांना योग्य सूचना न मिळाल्याने त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही हजेरीचे पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यासंबंधी परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनाही योग्य माहिती देण्यात येईल, असेही पुढे ते म्हणाले. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी निकालामध्ये गैरहजर दाखविल्याच्या तक्रारी घेऊन विद्यापीठामध्ये सोमवारी धाव घेतली होती. परीक्षाभवनातील कर्मचाऱ्यांना या प्रकाराबाबत माहिती नसल्याने एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत होती. आधीच निकालरखडपट्टीने हैराण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असल्याचे परीक्षाभवनामध्ये प्रकर्षांने जाणवून आले.

झाले काय?

महाविद्यालयांना पाठविलेल्या निकालाच्या गोषवाऱ्यामध्ये राखीव ठेवलेल्या निकालांमध्ये विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये गैरहजर असल्याचे दिसत आहे. हा गोंधळ  तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण निकालापैकी एक किंवा दोन विषयांचा निकाल मूल्यांकन बाकी असल्याने किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे तयार नाही. परंतु त्यांचे इतर विषयाचे मूल्यांकन पूर्ण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे अन्य विषयाचे गुण दाखविण्याची सोयच तंत्रज्ञानामध्ये नाही. त्यामुळे ज्या विषयाचा निकाल तयार नाही त्या विषयामध्ये गैरहजर दाखवून त्याचा निकाल राखीव ठेवण्याचा एकच पर्याय उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

निकालानंतरही प्रतीक्षा कायम

रविवारी वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्रातील १३,३८१ आणि सहाव्या सत्रातील ६५,९९२  विद्यार्थ्यांचा निकाल लागला. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेला निकाल संकेतस्थळ कोलमडल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांना पाहणे शक्य झालेले नाही. असंख्य विद्यार्थ्यांनी  लॉगइन केल्याने सव्‍‌र्हरवर ताण आला आहे. ही अडचण लक्षात घेऊन दुपारनंतर १०-१० हजार विद्यार्थ्यांच्या निकाल वेगवेगळ्या फायलींच्या माध्यमातून संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या लॉगइनमध्ये निकाल उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांच्या महाविद्यालयामध्ये निकाल पाहणे शक्य होणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी न करता मंगळवारी महाविद्यालयाशी संपर्क करावा, अशी सूचना विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.