पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील अनागोंदीने रोष

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत झालेला गोंधळ आणि त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांची थंड भूमिका यामुळे आता पालक आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पहिल्या फेरीतच प्रवेश मिळावा अथवा पुढील फेरीत प्रवेशाची खात्री वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी पदव्युत्तर (एमडी, एमएस) अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे जवळपास अडिचशे ते तिनशे विद्यार्थ्यांना गुणवत्तायादीत नाव असूनही प्रवेश मिळाला नाही. खासगी संस्थांबाबत शासकीय यंत्रणांनी मात्र थंड भूमिका घेतली आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र पुढील फेरीत रिक्त राहिलेल्या जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पुढील फेरीतील प्रवेशाची खात्री नसल्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयांतच प्रवेश मिळावा किंवा दुसऱ्या फेरीत हव्या त्या शाखेला प्रवेश मिळवून देण्याची खात्री प्रशासनाने द्यावी. शुल्क नियमन प्राधिकरणाने सामान्य कोटय़ाची शुल्कवाढ करू नये. विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयांत ठरलेल्या शुल्कानुसार प्रवेश देण्यात यावा अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. पालक आणि विद्यार्थी प्रवेश परीक्षा कक्षासमोर सोमवारी जमणार आहेत.

‘खासगी महाविद्यालये शुल्कवाढ करण्याच्या मागणीसाठी सामान्य कोटय़ातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंचे प्रवेश नाकारून विद्यार्थी आणि पालकांनी मानसिक त्रास देत आहेत. व्यवस्थापन कोटय़ामध्ये शुल्कवाढ करतानाच सामान्य कोटय़ाचे शुल्क वाढवून घेण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. शुल्क नियमन प्राधिकरणाने ठरवल्यानुसारच शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत. त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात यावे. मुळात आताचे शुल्कही सामान्य घरातील विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे सामान्य कोटय़ाचे शुल्क वाढवण्यात येऊ नये,’ असे पालकांनी सांगितले.