दंड थोपटून मैदानात उतरलेल्या कुस्तीगीरासमोर त्याच्याच ताकदीचा प्रतिस्पर्धी हात, पाय, तोंड आणि डोळे बांधलेल्या अवस्थेत उतरवला तर त्याची काय अवस्था होईल? तशीच अवस्था फेब्रुवारी महिन्यात राज्यातील बोर्डाच्या बारावीतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर अभ्यासक्रम तयार करणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाने (एचएससी) परीक्षांचे वेळापत्रक मात्र आपल्या पारंपरिक पद्धतीने आखले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाचा आवाका मोठा पण परीक्षेपूर्वीच्या सरावाला वेळच नाही, अशा विवंचनेने सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रासले आहे.
या वर्षीपासून पहिल्यांदाच एचएससी बोर्डाचे विद्यार्थी सीबीएसईच्या धर्तीवर विस्तारलेल्या बारावी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. जुने अध्यापन तंत्र, शिक्षकांना अध्यापनासाठी मिळालेला अपुरा वेळ यामुळे बारावीच्या परीक्षेला सामोरे जायचे तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहेच; पण त्याचबरोबर एचएससी बोर्डाने परीक्षांचे वेळापत्रक आखताना या साऱ्यांचा विचार न केल्याने विद्यार्थ्यांचे आणखी हाल होत आहेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या मुख्य विषयांच्या परीक्षा अवघ्या एकेका दिवसाच्या अंतराने होणार आहेत.  त्यामुळे कितीही चिकाटीने अभ्यास केला तरी एका दिवसाच्या मुदतीत संपूर्ण विषयाचा सराव शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
बदल अशक्य
दरवर्षी बारावीचे सुमारे १४ ते १५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. मंडळावर सीबीएसईच्या तुलनेत परीक्षेच्या कामाचा प्रचंड बोजा असतो. त्यामुळे वेळापत्रकात आयत्या वेळेस बदल करता येणे शक्य नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
(विषय, सीबीएसई बोर्ड आणि एचएससी या क्रमाने)
भौतिकशास्त्र.    ५ मार्च    २५ फेब्रुवारी
रसायनशास्त्र    ११ मार्च    २७ फेब्रुवारी
जीवशास्त्र        १५ मार्च      ४ मार्च
गणित             २० मार्च      १ मार्च