सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे काय होणार, अंजली दमानिया यांचा सवाल

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार डोक्यावर असलेले माजी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीस ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्या आयोजित करण्यात आलेल्या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे पुढे काय होणार, असा सवाल ज्येष्ठ समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला आहे.

तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या समग्र या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री फडवणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि सुप्रिया सुळे, अभिनेते नाना पाटेकर आदींना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे.

सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनील तटकरे या दोन तत्कालीन जलसंपदामंत्र्यांची चौकशी सुरू आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोन घोटाळ्यांच्या आरोपपत्रांमध्ये अजित पवार आणि तटकरे यांची चौकशी सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे कितपत योग्य आहे, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. सिंचन घोटाळ्यांचा आरोप करून विरोधात असताना बैलगाडीतून पुरावे म्हणून कागदपत्रे सादर केली होती. तेच फडणवीस आता तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्याने त्याचा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर नक्कीच परिणाम होईल, अशी भीतीही दमानिया यांनी व्यक्त केली आहे.