सुरेश प्रभू यांचा गौप्यस्फोट

राज्याचे मुख्यमंत्री महापालिका प्रचारामध्ये मतदारांना भाजपच्या ‘विकासा’चा चेहरा म्हणून बुलेट ट्रेनचे गाजर दाखवत असले, तरी प्रत्यक्षात बुलेट ट्रेनचा प्रकल्प काँग्रेसचीच संकल्पना असल्याचा निर्वाळा दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची संकल्पना काँग्रेसनेच मांडली होती, मोदी सरकार फक्त ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहे, असे प्रभू यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री बुलेट ट्रेनचे श्रेय कोणत्या शब्दांत लाटणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई-अहमदाबाद यांदरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याचा डाव आहे, अशी टीका काही राजकीय पक्षांनी केली होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरातील प्रत्येक प्रचारसभेत बोलताना बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उल्लेख करून बुलेट ट्रेन विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, ते सांगत आहेत. तसेच भाजपच्या विकासाचा हा खरा चेहरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही संकल्पना मांडल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितले आहे.या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थित असता बुलेट ट्रेन ही काँग्रेसची संकल्पना असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मोदी सरकार केवळ काँग्रेसचीच संकल्पना राबवत आहे. विरोधकांनी केवळ करायचा म्हणून विरोध करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही संकल्पना काँग्रेसची असेल, तर भाजप बुलेट ट्रेनचे श्रेय कसे काय घेते, असा प्रश्न आता विरोधक करत आहेत.

रुळांच्या तपासणीसाठी यंत्र

देशभरात होणारे घातपाताचे प्रयत्न अयशस्वी ठरवण्यासाठी आता रेल्वे एक नवीन यंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी गाडी चालण्याआधी हे यंत्र त्या मार्गावरून चालवले जाईल. त्याद्वारे रूळ योग्य स्थितीत आहेत की नाही, याची माहिती मिळेल आणि अपघात टाळता येतील, असेही प्रभू यांनी सांगितले.