सुशांत सिंह प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अख्त्यारित असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. दरम्यान मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आणखी वाचा- सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “सरकारमधील एका व्यक्तीसाठी…,” नारायण राणे यांचा मुंबई पोलिसांना सल्ला

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. या निर्णयावर राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही”.

आणखी वाचा- “मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली..,” सुशांत प्रकरणी आशिष शेलार यांनी विचारले सहा प्रश्न

“मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. जर आपल्याच राज्यातील राजकारणी त्यांच्याविरोधात बोलत असतील तर ते खच्चीकरण करत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.