सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे बुजगावणं आहेत, अशा शब्दातं वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत बोलताना त्यांनी सोलापूरमधील काँग्रेसचे उमेदवार आणि स्वतःच्या प्रतिस्पर्ध्यावर तोफ डागली.

आंबेडकर म्हणाले, सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री असताना बीएसएफ, अर्धसैनिक दल त्यांच्या अखत्यारित होतं. या दलांना बुट आणि जॅकेट्ससाठी चामड्याची गरज असते. महाराष्ट्र सरकारने राज्यातील चर्मकाऱांसाठी लेदर डेव्हलपेंट कार्पोरेशन निर्माण केलं आहे. मात्र, सोलापूरात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या चर्मकार आणि ढोर समाजासाठी शिंदेंनी काहीही केलं नाही. तसेच सोलापुरातल्या बौद्धांच्या आणि मातंगांच्या सवलतींसाठी कधी मोर्चा काढला नाही त्यामुळेच ते केवळ दलितांमधील एक नाव आणि काँग्रेस पक्षाचं बुजगावणं आहेत.

दरम्यान, घटनाकारांच्या घटनेचा खून करण्याचे काम त्यांच्या नातवानं केलं, या शिंदेंच्या आरोपांवर उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, काँग्रेसनही त्यांच्या कार्यकाळात घटना बदलण्याचा प्रयत्न केला. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी संसदीय लोकशाही नको, अध्यक्षीय लोकशाही हवी असं म्हटलं होतं. हे विधान आपण इंदिरा गांधींना विचारुन केल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

आंबेडकर म्हणाले, अकबरुद्दीन ओवेसी, नामदेव ढसाळ आणि राजा ढालेंची भाषाही एकच आहे. मात्र, ढसाळ आणि ढाले हे बौद्ध असल्याने हिंदू व्याख्येमध्ये येतात आणि ओवेसी मुस्लिम असल्याने त्यांना वेगळं मापदंड लावलं जात आहे. मात्र, त्यावेळी आपण ढसाळ आणि ढाले यांच्या भुमिकेला मी विरोध केला होता तसेच अकबरुद्दीनच्या विधानालाही विरोध केला होता. कारण, राज्य व्यवस्थेला आपण आव्हान देऊ शकत नाही, असं माझं मत आहे.