पोलिसांनी दडपशाहीचा कळस केला असून भूमिगत आंदोलक कार्यकर्त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना त्रास देत त्यांना ताब्यात घेत आहेत. पोलीस महिलांशी अश्लील भाषेत बोलत खालच्या पातळीला गेल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकार आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता निर्णयाची वेळ आली आहे. शेतकरी आंदोलक उद्यापासून जनावरांसोबत महामार्ग रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे दूध आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी ‘स्वाभिमानी’ने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलक दुधाचे टँकर फोडत असून दूध, दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतून देत आहेत. विविध भागातून पोलीस संरक्षणात दूधाचे टँकर पुण्या-मुंबईकडे पाठवले जात आहेत. यावरही शेट्टी यांनी निशाणा साधला. १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये २ हजार लिटर दूध पोलीस संरक्षण घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मी आडमुठी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. सरकार दुट्टप्पी भूमिका घेत आहे. मला त्यांनी कुठल्याही चर्चेसाठी बोलावलेले नाही. त्यांनी कुठे बोलावले होते हे एकदा जाहीर करावे, असेही ते म्हणाले. हे सरकार खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असून या लोकांना सरकारची तिजोरी लुटायची असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आंदोलकांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना ताब्यात घेऊन त्रास दिला जात आहे. महिलांना अश्लील भाषेत पोलीस बोलत आहेत. महाविद्यालयाला जाणारे, नोकरी करणाऱ्या आंदोलकांच्या भावांना ताब्यात घेतले जात आहे. त्यांना नाहक त्रास देत आहेत. आता उद्यापासून आम्ही जनावरांना घेऊन महामार्ग रोखणार असल्याचे त्यांनी सांगितले.