मालकाच्या कारखान्यात ९० लाखांचा डल्ला मारणाऱ्या कारागिराने सर्व पुरावे नष्ट केले. पण त्या दिवशी टॅक्सीने प्रवास करणे त्याला महागात पडले. कधी नव्हे तो हा टॅक्सीने का गेला असा संशय पोलिसांना आला आणि काळाचौकी येथील ९० लाखांचे चोरीचे प्रकरण गुन्हे शाखा ४ च्या पथकाने उघडकीस आणले.
 काळाचौकी येथील फेरबंदर येथे अरविंद मेहता यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. तेथील पोटमाळ्यावरून १० ऑगस्ट रोजी ९० लाखांचे दागिने चोरण्यात आले होते. पोलिसांनी कारखान्यातील सर्वच्या सर्व चार कामगारांची कसून चौकशी केली तरी काही दुवा हाती लागत नव्हता. गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. कारखान्यातील एक कारागीर संजय खरा (२८) हा त्या दिवशी टॅक्सीने जाताना पाहिले होते. एरवी कधी टॅक्सीने प्रवास न करणारा संजय कसा काय टॅक्सीने गेला यावरून पोलिसांना संशय आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम आणि अभिजित शिंदे यांनी कसून चौकशी केली आणि तो जाळ्यात सापडला. संजयने या कामासाठी आपल्या मेव्हण्याला बोलावून घेतले होते. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मेव्हण्याला विमानाने दागिने घेऊन बंगालला पाठवले.  पुरावे ठेवले नसले, तरी  पोलिसांनी कसून चौकशी करीत त्याला पकडले.