विक्रोळीतील कमलाबाई वायगुडे शाळेतील प्रकार

शिक्षा म्हणून २५ हून अधिक विद्यार्थ्यांचे केस कापल्याबद्दल विक्रोळीच्या कमलाबाई वासुदेव वायगुडे इंग्रजी शाळेतील शिक्षक, शिपाई अशा दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. या प्रकरणी दाखल गुन्हय़ात शाळा संचालकाच्या मुलाचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार टागोरनगर परिसरात शाळा असून तिथे सुमारे आठशे विद्यार्थी शिकतात. गुरुवारी सर्व विद्यार्थ्यांना केस कापण्याबाबत शाळेने तोंडी सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी सकाळी केस न कापताच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना थांबवण्यात आले. पटांगणात या विद्यार्थ्यांचे केस कापण्यात आले. विचित्रपणे कापलेल्या केसांमुळे विद्रूप झालेले विद्यार्थी वर्गात आले तेव्हा त्यांना अन्य विद्यार्थ्यांनी हिणवले. काही विद्यार्थी या अपमानामुळे रडत रडत घरी गेले. त्यानंतर काही पालक जाब विचारण्यासाठी शाळेत आले. पालकांच्या तक्रारीवरून संचालकांचा मुलगा गणेश बट्टा, पीटी शिक्षक मिलिंद झनके आणि शिपाई तुषार गोरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३५५ अन्वये गुन्हा नोंदवला. गुन्हा अजामीनपात्र असल्याने झनके, गोरे यांना अटक करण्यात आली, तर गणेशचा शोध सुरू आहे.

पालकांच्या तक्रारीनुसार गणेशच्या सूचनेवरून झनके व गोरे यांनी विद्यार्थ्यांचे केस कापले. प्रत्यक्षात शाळेने लेखी नोटीस किंवा फलक लावला नव्हता. काहींना तोंडी आदेश दिले होते तर काहींना त्याबद्दल माहिती नव्हती. हा प्रकार अमानुष असल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले आहे.