औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रकाराबाबत शिक्षकांमध्ये नाराजी

मुंबई : शिक्षक प्रशिक्षण ऑनलाइन करण्याच्या नावाखाली तासाभरात प्रशिक्षणे उरकण्याच्या शासनाच्या निर्णयावर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तासाभराच्या एकतर्फी प्रशिक्षणाने काय साधणार, मग प्रशिक्षण घ्यायचे कशासाठी असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा पहिली आणि आठवीची पाठय़पुस्तके बदलण्यात आली आहेत. पहिलीसाठी साहित्य पेटय़ा देऊन त्यांच्या आधारे अध्यापन करण्यासाठी पहिलीची पुस्तके बदलण्यात आली. त्याचबरोबर यापुढे शिक्षण विभागाने दिलेल्या अध्ययन निष्पत्ती तक्त्यातील उद्दिष्टये साध्य करण्याच्यादृष्टीने वर्गामध्ये अध्यापन करण्याची अपेक्षाही विभागाने व्यक्त केली आहे. मात्र म्हणजे नेमके काय आणि कसे बदल करावेत याबाबत शिक्षकांममध्ये अद्यापही गोंधळ आहे. मात्र त्यासाठीची प्रशिक्षणे तासाभरात उरकण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयावर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

‘प्रशिक्षणे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. आता आयोजित केलेली प्रशिक्षणे ही केवळ औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रकार आहे,’ असे एका शिक्षकांनी सांगितले. त्याचप्रमाणे एकिकडे कृतिशील शिक्षणासाठी योजना आखणाऱ्या शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी तासाभराचे ऑनलाइन व्याख्यान का ठेवावे असा प्रश्नही शिक्षक उपस्थित करत आहेत. प्रत्यक्षात वर्गात तज्ज्ञ शिकवतात, त्यामध्ये ऑनलाइन प्रशिक्षणात फरक पडतो, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

फसलेला प्रयोग

नवा अभ्यासक्रम लागू करण्याची सुरूवात झाली. त्यावेळी साधारण चार वर्षांपूर्वी राज्यभरात एकाचवेळी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा घाट महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घातला होता. मात्र त्यावेळी अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आणि हा प्रयोग फसला. त्यानंतर शाळा शाळांमध्ये तज्ज्ञांच्या भाषणांच्या सीडी वाटून शिक्षण विभागाला शिक्षकांची बोळवण करण्याची वेळ आली होती.