बंद शाळेत नियुक्ती; नियमांचे उल्लंघन, प्रक्रिया पारदर्शक नसल्याची टीका

गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या वादानंतर अखेरीस राज्यातील बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये शिक्षकांना बदलीचे आदेश मिळाले. मात्र बदल्यांचे हे नाटय़ संपण्याऐवजी आणखीच वाढले आहे. उपलब्ध जागांपेक्षा अधिक शिक्षकांना एकाच शाळेवर रुजू होण्याचे आदेश, बंद शाळेत बदली, असे अनेक गमतीदार प्रकार बदल्या करताना केले गेले आहेत.  बदल्यांच्या प्रक्रियेबाबत आक्रमक झालेल्या शिक्षकांनी तक्रारी सुरू केल्या आहेत. या नाटय़ात गल्लोगल्लीच्या शिक्षक संघटनांनी अधिकच भर घातली असून बदल्यांमधील घोळ या संघटनांसाठी कुरण ठरल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षीपासून राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. शैक्षणिक वर्षांच्या मध्यात बदल्या नकोत म्हणून आक्षेप घेतल्यामुळे गेल्या वर्षी सुरू झालेली बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर बदल्या करण्याचा घाट शिक्षण विभागाने नव्याने घातला. अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी, प्रणालीतील गोंधळ, लांबलेली प्रक्रिया अशा तक्रारी सुरू झाल्या.

रात्र रात्र सायबर कॅफेमध्ये तळ ठोकून बदलीचा अर्ज भरणाऱ्या शिक्षकांचे फोटो समाजमाध्यमांवर फिरले. या सगळ्या गोंधळातून अखेरीस साधारण १७ जिल्ह्य़ांतील शिक्षकांच्या हाती बदल्यांचे आदेश पडले आहेत. राहिलेल्या जिल्ह्य़ांतील शिक्षकांच्या हाती येत्या चार ते पाच दिवसांत बदल्यांचे आदेश मिळणार आहेत. मात्र तरीही बदल्यांच्या या नाटय़ावर अद्याप पडदा पडलेला नाही. किंबहुना बदल्यांचे आदेश आल्यानंतर शिक्षक आणि प्रशासनाचे हे बदलीनाटय़ अधिकच रंगू लागल्याचे दिसत आहे. बदल्यांच्या प्रक्रियेबाबत शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत, तर बदल्यांची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पार पाडण्याबाबत प्रशासन ठाम आहे.

अनेक तालुक्यांमध्ये सध्या बदल्यांबाबत शिक्षक आक्रमक झाले आहेत. पती-पत्नी दोघेही शिक्षक असतील तर त्यांना ३० किलोमीटरच्या आतील शाळा मिळावी असे संकेत आहेत, त्याचेही उल्लंघन झाले आहे. दिलेल्या पर्यायांपेक्षा वेगळ्याच गावी बदली झाली आहे, असे आक्षेप शिक्षकांनी घेतले आहेत. बदल्यांची यादी जाहीर करण्याऐवजी वैयक्तिक आदेश देण्यात आल्यामुळे प्रक्रिया पारदर्शक झालेली नाही असेही शिक्षकांचे म्हणणे आहे.

घोळाचे मासले..

जळगाव जिल्ह्य़ात एका शिक्षकाला बंद झालेल्या शाळेत रुजू होण्याचे आदेश मिळाले असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. दुसऱ्या एका जिल्ह्य़ात शाळेत चार शिक्षकांची जागा असताना प्रत्यक्षात १४ शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश मिळाले असल्याचे कळते आहे. एकाच जागेसाठी दोन शिक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. ज्येष्ठ शिक्षकांच्या जागी कनिष्ठ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. शाळेत पन्नास टक्के शिक्षिका असण्याचा नियम असताना प्रत्यक्षात एकमेव शिक्षिकेचीही बदली करण्यात आली आहे.

शिक्षक संघटनांना कुरण

मान्यता असलेल्या किंवा राज्यस्तरावर विस्तार असलेल्या शिक्षक संघटनांशिवाय राज्यभरात अगदी गाव, तालुका पातळीवरही शिक्षक संघटना आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेत संघटना सक्रिय झाल्या आहेत. या प्रक्रियेत संघटनांनी हात धुऊन घेतले आहेत. काही संघटनांकडून बदल्यांच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्यासाठी पैसे गोळा करण्यात येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. काही संघटनांनी बदल्यांच्या विरोधात आंदोलने करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

राज्यातील काही जिल्हे वगळता ३१ मेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल.  बदल्यांबाबत काही आक्षेप आले आहेत. बहुतेक आक्षेप हे सेवाज्येष्ठतेबाबत आहेत. मात्र त्यात फारसे तथ्य आढळलेले नाही. प्रत्येक आक्षेपाची शहानिशा करून पुढील प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  ही प्रक्रिया संगणक प्रणालीत भरण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे. या प्रक्रियेत एक किंवा दोन टक्क्यांपेक्षा जास्त चुका असण्याची शक्यता नाही.’

असिम गुप्ता, सचिव, ग्रामविकास विभाग