शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमध्ये नाराजी

मुंबई : सध्या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त बहुतांश लोक परगावी गेलेले असताना मतदार नोंदणी व पडताळणीच्या कामासाठी शिक्षकांना तातडीने कामावर हजर होण्याचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पाठवल्याने ऐन सुटीच्या दिवसांत अशा शिक्षणबाह्य़ सरकारी कामाला सक्तीने जुंपले जात असल्याने शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. आयत्या वेळी गावाहून-परराज्यातून कामावर कसे हजर व्हायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

मुळात शिक्षकांना शाळाबाह्य़ कामांसाठी जुंपले जात असल्याबाबत शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी वारंवार हरकत घेतली आहे. तरीही शिक्षकाला सर्वत्र प्रवेश असतो, गावात सगळे जण मान देतात या कारणास्तव अनेक सरकारी कामांत शिक्षकांना जुंपले जाते. तशात आता ऐन मे महिन्यात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी व पडताळणीचे काम करण्यासाठी तातडीने हजर व्हावे. त्यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारे पत्र मुंबईच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षण निरीक्षकांमार्फत मुंबईतील सर्व शिक्षकांना पाठवले आहे. यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.

* उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस असल्याने बहुतांश शिक्षक आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी इतर राज्यांत गेले आहेत. अशा वेळी अचानक मतदार नोंदणीच्या कामासाठी तातडीने कामावर हजर होण्याचा आदेश कसा काय दिला जाऊ शकतो, असा संतप्त सवाल राज्य मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी केला आहे.

* त्याचबरोबर आयत्या वेळी परत मुंबईत येणे कोणालाच शक्य होणार नाही. अशी कामे नियोजन करून करायला हवीत, असेही त्यांनी म्हटले आहे.