गेला आठवडाभर दिलासा मिळालेल्या मुंबईला शनिवारी पुन्हा उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागले. कुलाबा केंद्रावर ३४.८ अंश, तर सांताक्रूझ केंद्रावर ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे शुक्रवारच्या तुलनेने तापमानात जवळपास पाच अंशांनी वाढ झाली.

मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान शनिवारी नोंदवले गेले. यापूर्वी ४ मार्चला ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते.  मार्चचा पहिला आठवडा उकाड्याचा ठरला. त्यानंतर काही दिवस तापमानात घट झाली होती. गेल्या काही दिवसांत ही घट ३५ अंशांखाली गेली होती. सर्वाधिक घट ११ मार्चला, ३१.७ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. मात्र शनिवारी अचानक तापमानाने उसळी घेतली आणि उन्हाचा तडाखा जाणवू लागला.

कारण काय?

जमिनीलगत वाहणाऱ्या उत्तरपूर्वी वाऱ्यांमुळे समुद्रावरून येणारी हवा उष्ण स्वरूपाची होती. परिणामी शनिवारी कमाल तापमानात वाढ झाली. पुढील दोन दिवस हीच स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.