महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई : महात्मा फुले मंडईजवळील (क्रॉफर्ड मार्केट) धोकादायक बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या इमारतीमधील मासळी विक्रेत्यांना ऐरोली नाका येथे हलवण्याची नोटीस पालिकेने जारी केल्यानंतर मासळी विक्रेत्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. मासळी विक्रेत्यांना स्थलांतरित करू नये यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेतली. दरम्यान, मासळी विक्रेत्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात येत असल्याचे आश्वासन आयुक्तांनी मनसे अध्यक्षांना दिले.

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी बाजारात मासळीची घाऊक आणि किरकोळ विक्री केली जाते. या मासळी बाजारातील घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या मासळीची कोळी महिला ठिकठिकाणी किरकोळ विक्री करतात. मात्र या मंडईची इमारत धोकादायक बनल्यामुळे मासळी विक्रेत्यांना ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याची नोटीस या इमारतीवर चिकटविण्यात आली होती. इतक्या लांब मासळी खरेदीसाठी जाणे आणि पुन्हा ती विकण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी पोहोचणे कोळी महिलांना शक्य नाही. यामुळे मासळी विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. तसेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या मासळी विक्रेत्यांचे दक्षिण मुंबईतच स्थलांतर करण्यात येईल अशी घोषणा केली. राज ठाकरे यांनी मासळी विक्रेत्यांच्या प्रश्नासाठी सोमवारी प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेतली.

शिवाजी मंडईतील कोळी महिला विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. मंडईच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा याच ठिकाणी आणण्यात येईल, असे आश्वासन प्रवीणसिंह परदेशी यांनी राज ठाकरे यांना दिले.

‘आयुक्तांच्या लेखी हमीपत्रानंतरच जागा सोडू’

छत्रपती शिवाजी महाराज मंडईची पुनर्बाधणी झाल्यानंतर मासळी विक्रेत्यांचे त्याच जागेत पुनर्वसन करण्याचे पालिका आयुक्तांचे लेखी हमीपत्र मिळाल्याशिवाय मासळी विक्रेत्या महिला मंडईचा ताबा सोडणार नसल्याचा इशारा मच्छीमार कृती समितीने दिला आहे. पोलिसी बळाचा वापर केल्यास मुंबईतील सर्व मासळी बाजारांतील १५ हजार कोळी महिला मासळी कापायचे कोयते घेऊन रस्त्यावर उतरतील, असे मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले.