पर्यावरण पूरक अशा विद्युत वाहनांच्या उत्पादनात महाराष्ट्र हे मोठे केंद्र व्हावे, यादृष्टीने विद्युत वाहननिर्मितीत अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या ‘टेस्ला’ या कंपनीचे गुंतवणुकीसाठी मन वळवावे. त्यासाठी उद्योग विभागात टेस्ला कक्ष स्थापन करावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

विद्युत वाहनांच्या निर्मितीत अमेरिकेतील ‘टेस्ला’ ही इलॉन मस्क यांची कंपनी आघाडीवर आहे. आपल्या उद्योगाचा विस्तार भारतात करण्याचा मनोदय इलॉन मस्क यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले होते. पण दोनच दिवसांपूर्वी टेस्लाने कर्नाटकातील बेंगळूरुमध्ये गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले.

या घटनेच्या एकच दिवस आधी ११ जानेवारी रोजी आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून टेस्लाने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली होती. टेस्लाला पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरपैकी हवी तेथे जागा द्यावी. तसेच उद्योग विभागात टेस्ला कक्ष स्थापन करण्याची सूचना करावी. या व्यवस्थेसाठी विशेष सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. टेस्लाबरोबरच विद्युत वाहननिर्मितीशी संबंधित इतर कंपन्यांनाही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करता येईल, असे रोहित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.