कोकणातल्या प्रवाशांचे वातानुकूलित डबलडेकर गाडीतून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ही वातानुकूलित डबलडेकर गाडी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचली असून पुढील आठवडय़ात या गाडीची चाचणी सुरू होणार आहे. या चाचणीच्या र्सवकष सुरक्षा विषयक अहवालानंतर मग या गाडीला कोकण प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.
मुंबई-मडगाव या मार्गावर बाराही महिने प्रवाशांची वाहतूक सुरूच असते. या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना सामावून घेणारी आणि वातानुकूलित आरामदायक प्रवासाचा अनुभव देणारी डबलडेकर गाडी चालवण्याबाबत कोकण रेल्वे उत्सुक होती. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने पारसिकच्या बोगद्याचे कारण दिले होते. पण डबलडेकर गाडीची रुंदी आणि उंची दुरांतो गाडीएवढीच असल्याने काहीच अडचण येणार नसल्याचेही कोकण रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले होते. अखेर या डबलडेकर गाडीचे दहा डबे भोपाळवरून मुंबईत दाखल झाले आहेत.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेने रोह्यापर्यंत गाडय़ांची वेगमर्यादा कमी केली आहे. ही वेगमर्यादा पुढच्या आठवडय़ात मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावर पूर्ण वेगाने गाडीची चाचणी होणार आहे.
रोह्यापुढे कोकण रेल्वेमार्गावरील बोगदे, वळणावरील रूळ, उंच पूल या सर्व ठिकाणी गाडीची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी या गाडीत दगड-मातीने भरलेल्या गोणी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या स्थितीत या गाडीची चाचणी घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सुरक्षाविषयक अहवाल सादर केला जाईल.
या अहवालाचा अभ्यास करून मगच मुंबई-मडगाव या मार्गावर गाडी चालवण्यासाठी हिरवा कंदील दिला जाईल.