News Flash

परप्रांतियांविरोधात भूमिका घेणारं ठाकरे घराणं मूळचं बिहारचंच, प्रबोधनकारांनी केला होता खुलासा

उद्धव आणि राज यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या नवीन पुस्तक प्रकाशित

'द कझिन्स ठाकरे: उद्धव राज अॅण्ड द शॅडो ऑफ सेनाज'

उत्तर भारतीयांचा विरोध करण्याची भूमिका घेणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे मूळ हे बिहारमधील असल्याचा दावा एका नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघांमधील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘द कझिन्स ठाकरे: उद्धव राज अॅण्ड द शॅडो ऑफ सेनाज’ पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये शिवसेनेची स्थापना करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ठाकरे घराणं मूळचे बिहारचे असल्याचे आपल्या पुस्तकात म्हटल्याचा संदर्भ दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेकदा उत्तर भारतीयांचा विरोध केल्याचे दाखले सापडतात. मात्र ठाकरे कुटुंबाचे मूळ हे बिहारमधील असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. प्रबोधनकारांनी त्यांच्या ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंडखोर’ पुस्तकामध्ये ठाकरे कुटुंबाचे मूळ बिहारमधील असल्याचा संदर्भ दिल्याचे लेखकाने म्हटले आहे. ‘ठाकरे कुटुंब चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजातील आहे. इसवी सनपूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकामध्ये हा समाज महापद्म नंदाचे सम्राज खालसा झाल्यानंतर प्राचीन मगधमधून (सध्याचे बिहार) बाहेर पडले. मगधमधून बाहेर पडल्यानंतर या समाजातील व्यक्ती योद्धे आणि पंडीत म्हणून इतर ठिकाणी वास्तव्य करु लागले,’ असं प्रोबधनकार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्याचे लेखकाने आपल्या पुस्तकात अधोरेखित केले आहे. महापद्म नंदा हे प्राचीन भारतामधील पहिले सर्वात मोठे सम्राज्य असल्याचे मानले जाते.

१९९३ साली डिसेंबर महिन्यामध्ये राज ठाकरेंनी नागपूरमध्ये पहिल्यांदाच बेरोजगार तरुणांच्या मोर्चाचे आयोजन केले. त्याचवेळी उद्धव आणि राज या चुलत भावांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरु झाल्याचे कुलकर्णी यांनी पुस्तकामध्ये म्हटले आहे. ‘नागपूरमधील या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळणारे हे दिसून आल्यानंतर मोर्चाच्या दिवसाच्या आदल्या रात्री राज यांना मातोश्रीवरुन फोन आला. उद्धव यांनाही सार्वजनिक सभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात यावी असं राज यांना सांगण्यात आले होते. त्यावेळी राज हे नागपूरमधील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये थांबले होते. हा फोन आल्यानंतर राज यांना उद्धव या मोर्चाच्या आयोजनाचे श्रेय घेऊन जातील अशी चिंता लागून राहिली होती,’ असा दावा लेखकाने ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयाचा दाखला देत आपल्या पुस्तकात केला आहे. या पुस्तकामध्ये कुलकर्णी यांनी उद्धव आणि राज यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कशापद्धतीने वेगळा आहे यावरही भाष्य केले आहे.

राज आणि उद्धव यांच्यात जानेवारी २००६ मध्ये मतभेद इतक्या टोकाला पोहचले की राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. या पुस्तकामध्ये राज आणि उद्धव यांच्या नातेसंबंधांबरोबरच शिवसेना आणि मनसेचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक पैलूंवरही लेखकाने प्रकाश टाकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 11:27 am

Web Title: thackeray family traces origin to bihar says new book scsg 91
Next Stories
1 मुंबईकरांनो…खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीने शोधला ‘हा’ उपाय !
2 मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात
3 मुंबईतील अनेक भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी
Just Now!
X