मध्य रेल्वेच्या चालढकलपणामुळे तीन वर्षे रेंगाळलेली ठाणे-कसारा मार्गावरील शटल सेवा आता आठवडाभरात प्रत्यक्ष रुळावर येण्याची शक्यता आहे. या सेवेसाठी एक रेक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक जी. एस. बॅनर्जी यांनी शुक्रवारी कल्याण-कसारा प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
तीन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर शटल स्वरूपाच्या ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत कर्जत मार्गावर शटल स्वरूपाच्या चार गाडय़ाच सध्या धावत आहेत. कसारा मार्गावर तर एकही शटल स्वरूपाची गाडी नाही.
यासंदर्भात सोमवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात कसारा शटल सेवेबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.