राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक संस्था कराला विरोध करत ठाण्यातील घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांनी पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली असून बंदबाबत व्यापारी वर्गातच तीव्र मतभेद आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीस सलग चार दिवस बाजारपेठा बंद करून व्यापाऱ्यांनी सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता. आता शनिवारपासून पुन्हा होणाऱ्या बंदसाठी नौपाडा परिसरातील व्यापाऱ्यांचा प्रभावशाली गट आग्रही आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील एकही व्यापारी एलबीटी अंतर्गत नोंदणी करून घेणार नाही, असा सूर सुरुवातीपासून ठाणे, कळवा भागातील व्यापारी संघटनांनी लावला होता. प्रत्यक्षात सुमारे तीन हजार व्यापाऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. तसेच ठाणे पालिकेत सुमारे आठ कोटी तर नवी मुंबई महापालिकेत १३ कोटी रुपयांचा स्थानिक संस्था करही जमा झाला आहे. तरी ठाणे, नवी मुंबई परिसरातील काही ठराविक व्यापाऱ्यांचा गट एलबीटीविरोधात टोकाची भूमिका घेत आहे.
दरम्यान, बेमुदत बंदचे फलक जागोजागी लावण्यात आले असून नौपाडा भागातील प्रमुख दुकानांच्या प्रवेशद्वारावर बेमुदत बंदची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत वस्तू खरेदी करा. शनिवारपासून बेमुदत बंद असणार आहे, असा मजकूर या फलकांवर दिसून येत आहे. या बंदमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आर्थिक कोंडी करणार
१५ दिवसांत सरकारने एलबीटी रद्द न केल्यास राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा इशारा शुक्रवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशीष पेडणेकर यांनी दिला. राज्यातील १६ पालिकांच्या हद्दीतील व्यापारी संघटनांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत मीरा रोड येथे बोलत होत़े