मुंब्रा येथील पारसिक बोगदा परिसरात धावत्या लोकलवर दगड फेकण्याचे प्रकार जसे होतात तसाच प्रकार कुर्ला-विद्याविहार मार्गावर घडला आहे. एका अज्ञाताने भिरकावलेल्या दगडामुळे ठाणेकर प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. इरफान लतीफ पावसकर असं या प्रवाशाचं नाव आहे. ठाण्यातील रूग्णालयात त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या घटनेची नोंद घाटकोपर रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ठाण्यात रहाणारे इरफान पावसकर हे सॅमसंग मोबाईल कंपनीत काम करतात. शनिवारी ते काम आटोपून दादर स्थानकावरून ठाण्याकडे जाण्यासाठी अंबरनाथ जलद लोकलमध्ये बसले. कुर्ला स्थानकात लोकल आली त्यानंतर कुर्ला स्थानकातून लोकल निघाली. कुर्ला स्टेशन जाताच अंधार असलेल्या एका ठिकाणी अज्ञाताने दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाचा मोबाईल पाडण्यासाठी दगड भिरकावला. मात्र हा प्रवासी खाली वाकला त्यामुळे दगड थेट पावसकर यांच्या डोळ्याला लागला. पावसकर यांच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. लोकलमधल्या प्रवाशांनी चेन खेचून लोकल घाटकोपर स्टेशनवर थांबवली. घाटकोपरमध्ये पावसकर यांना उतरवण्यात आले.

सदर घटनेची नोंद घाटकोपर रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी राजावाडी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे दोन इंजेक्शन देऊन पावसकर यांना केईएम रूग्णालयात जाण्यास सांगितले. दरम्यान इरफान पावसकर यांच्यावर ठाण्यातल्या मखमली तलावाजवळ असलेल्या व्हिजनरी रूग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. पावसकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांचा डोळा वाचणार की नाही हे मंगळवारी होणाऱ्या तपासणीनंतर समजणार आहे.