दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक दिलखुलास आठवण सांगितली. शरद पवार म्हणाले, भीमाशंकरला दिलीप वळसे पाटील यांच्या वडिलांसोबत अर्थात दत्तात्रय वळसे-पाटील यांच्यासोबत गेलो होतो. त्यावेळी मी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री होतो. एका खोलीत आमची राहण्याची सोय करण्यात आली आणि त्याचवेळी रात्री एकच्या सुमारास मला काहीशी हालचाल जाणवली. उठून बसलो तर माझ्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर गेला. मी पाच मिनिटे सुन्न झालो आणि दत्तात्रय पाटील यांना हाक मारली आणि घडलेला प्रकार सांगितला.

दत्तात्रय पाटील यांना ते एकून आनंदाने उकळ्या फुटल्या. ते म्हणाले, हा शुभशकुन आहे. आपण उद्या पहाटे पूजा करू. त्यांचा सल्ला ऐकून मी पूजा केली. आणि मग आम्ही दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या की मी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठ दिवसांत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो. दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो शुभशकुन मी त्यावेळी अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते. मी काही फारसा जात नाही. ही आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

दिलीपरावांच्या नोकरीचाही किस्सा

एकदा दिलीपरावांचे वडील दत्तात्रय पाटील माझ्याकडे दिलीपला घेऊन आले. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्याला नोकरी लावा, अशी विनंती त्यांनी मला केली. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सकपाळ होते. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे जागा आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या माणसाचा मुलगा आहे त्याच्या नोकरीचे बघा, असे सांगून मी दिलीपला त्यांच्याकडे पाठवले. त्यानंतर काय घडले माहिती नाही.

आठ दिवसांनी सकपाळांचा मला फोन आला की तुम्ही पाठवले होते त्या दिलीप वळसे पाटील यांना काही नोकरी करायची नाही. त्यानंतरच्या काळात मी विरोधी पक्षाचा नेता होता. माझ्यासोबत काम करण्याची जबाबदारी काही लोकांनी घेतली त्यावेळी दिलीप मला येऊन भेटला आणि म्हटला की मला हेच करायचे आहे. त्याचा प्रवेश राजकारणात झाला तेव्हापासून आजपर्यंत तो माझ्यासोबत काम करतो आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक दौऱ्यांची आखणी हे त्यावेळी दोन लोक करत असत मेहता नावाचे एक गृहस्थ होते ते आता हयात नाहीत आणि दुसरे होते ते दिलीप वळसे-पाटील अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.