ऑक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणारी वातानुकूलित उपनगरी गाडी चर्चगेट ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर चालविण्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे.रेल्वेच्या चेन्नई येथील कारखान्यात ही वातानुकूलित गाडी तयार केली जात आहे. अशा बारा वातानुकूलित गाडय़ा तयार केल्या जाणार आहेत. यापैकी पहिली उपनगरी गाडी येत्या ऑक्टोबर महिन्यात दाखल होणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
या पहिल्या वातानुकूलित उपनगरी गाडीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला चर्चगेट येथून ही गाडी सुटल्यानंतर गाडीला दादर, वांद्रे, अंधेरी अशा तीन ठिकाणीच थांबे देण्याचे ठरविण्यात आले आहे.ही उपनगरी गाडी कोणत्या वेळेत सोडायची त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ही वातानुकूलित गाडी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर गाडीची चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतरच वेळापत्रक लागू करुन गाडी सोडण्यात येणार आहे.