विक्रोळी, चेंबूर परिसरांत श्रीकृष्णाला प्रिय वृक्षांची लागवड

येत्या सोमवारी साजऱ्या होत असलेल्या गोपाळकाल्याच्या दिवशी किती उंच दहीहंडी उभारायची आणि किती थर लावायचे, याची व्यूहरचना सुरू असतानाच मुंबईतील काही तरुणांनी विक्रोळी, चेंबूरमध्ये ‘गोकुळ’ फुलवण्याचा निर्धार केला आहे. श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या कदंब, कृष्णवड, मुचकुंद, पारिजातक अशा वृक्षांची लागवड करण्यासाठी या तरुणांनी जय्यत तयारी केली आहे.

काही वर्षांपूर्वी पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र आलेल्या तरुणांनी ‘ग्रीन अंब्रेला’ नावाची संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून देशी वृक्षांच्या लागवडीचा संकल्प या तरुणांनी सोडला आहे. यंदा या संस्थेने श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या रोपांची विक्रोळी आणि चेंबूर परिसरांत लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये कृष्णवडाच्या झाडांची संख्या कमी असून विक्रोळीमधील एका कृष्णवडाच्या फांद्यापासून संस्थेच्या तरुणांनी रोपटी तयार केली आहेत. कदंब आणि कृष्णवडाची फळे कीटक, मधमाशा आणि पक्ष्यांचे खाद्य आहे. या झाडांची संख्या वाढली तर पक्ष्यांचा अधिवासही वाढू शकेल. या उद्देशाने संस्थेने मुंबईत कदंब आणि कृष्णवडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुचकुंद आणि पारिजात सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध आहेत. संस्थेने वसई येथे रोपवाटिका सुरू केली असून या रोपवाटिकेमध्ये आतापर्यंत भारतीय ५० प्रजातींची तब्बल १० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. केवळ वृक्षलागवडच नव्हे तर झाडांचे संगोपनही करण्यात येत आहे. या मोहिमेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे.

गोपाळकाल्याच्या निमित्ताने विक्रोळी आणि चेंबूर परिसरांत लागवड करण्यात येणाऱ्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी या परिसरातील काही सुज्ञ नागरिकांवर सोपविण्यात आली आहे. झाडांना नियमितपणे पाणी घालणे, झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून आधार देणे आणि वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या रहिवाशांना करण्यात आले आहे. यंदा गोपाळकाल्याच्या दिवशी रोपवाटिकेत तयार केलेल्या ८-९ कृष्णवड, २५ कदंब, कल्याण येथून विकत आणलेल्या पाच पारिजात आणि पुण्याहून आणलेल्या पाच मुचकुंदाची लागवड करण्यात येणार आहे.

गोपाळकाल्याच्या दिवशी असंख्य तरुण मुंबई-ठाण्यामध्ये दहीहंडी फोडण्यात मश्गूल असतात. याच तरुणांनी वृक्षलागवड आणि संवर्धनाचा संकल्प सोडल्यास ‘हरित मुंबई’चे स्वप्न साकारणे शक्य होईल.

– विक्रम यंदे, ग्रीन अंब्रेला