पती चिंतनवर पोलिसांचा अद्याप संशय
आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणी बुधवारी शिवकुमार राजभर ऊर्फ साधू या चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली. साधूला सोमवारीच उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला मुंबईत आणून अटक करण्यात आली. या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विद्याधर राजभर याचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग तसेच स्थानिक पोलिसांची विविध पथके राज्यात पाठविण्यात आली आहेत, असे सहआयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

कांदिवली दुहेरी हत्याकांडप्रकरणी हेमा यांचे पती चिंतन यांना सलग दोन दिवस पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. असे असले तरी चिंतन यांचा या दुहेरी हत्याकांडात सहभाग आहे किंवा नाही, याचीही खातरजमा सुरू आहे. त्यांच्यावर अद्याप संशय असल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

तू पण मुंबई सोडून जा..!

हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर याने खून करून पळून जाताना पत्नीला फोन केला होता. ‘मी मुंबई सोडून चाललो आहे.. तू देखील शहर सोडून लवकरात लवकर जा’, असे विद्याधरने पत्नीला सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. हेमा आणि तिच्या वकिलाचा खून केल्यानंतर विद्याधरने दादर गाठले. तेथे पोहोचल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास वाराणसीला जाणारी गाडी पकडण्याआधीच त्याने आपल्या पत्नीला फोन केला. या वेळी त्याच्यासह दुसरा आरोपी शिवकुमार राजभरही होता. विद्याधर आणि शिवकुमार यांनी वाराणसीला जाणारी गाडी पकडली, मात्र गाडी मध्य प्रदेशातील इटारसी स्थानकात पोहोचल्यावर विद्याधर गाडीतून उतरला. आपण स्वत: पोलिसांच्या स्वाधीन होण्यासाठी जात आहोत, असे शिवकुमारला सांगत त्याने ही गाडी सोडली. त्यानंतर तो फरारी झाला, असे तपासात पुढे आले आहे. पोलीस विद्याधरचा शोध घेत आहेत.