04 March 2021

News Flash

समाज, कुटुंबाचीही जबाबदारी

भारतात आयसिससारख्या संघटनेसाठी काम करीत असलेल्या काही तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने नुकतेच ताब्यात घेतले.

|| जयेश शिरसाट

भारतात आयसिससारख्या संघटनेसाठी काम करीत असलेल्या काही तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने नुकतेच ताब्यात घेतले. वेगवेगळय़ा माध्यमांतून या तरुणांचा बुद्धिभेद करून त्यांना दहशतवादी, घातपाती कारवाया करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. अशा भरकटलेल्या तरुणांना काही घडण्याआधीच रोखणे, सुरक्षा यंत्रणांना प्रत्येक वेळी शक्य होणार नाही. त्यामुळे समाज आणि कुटुंबानेच आपली मुले भरकटू नये, याकरिता त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

जग कब्जात घेण्याचे मनसुबे असलेल्या इस्लामिक स्टेटने (आयसिस) एके काळी विशिष्ट समाजातील तरुणांना भारले होते. आयसिसने सुरू केलेल्या ‘युद्धात’ प्रत्यक्ष सहभागी होण्याच्या ईर्षेने तरुण देशही सोडायला तयार होते. त्यांना आता विविध कारणांनी चाप लागला आहे. पण यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याचे सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हान आणखी बिकट झाले आहे.

आयसिसची गेल्या काही वर्षांतली पीछेहाट आणि इराक-तुर्कस्तानने कसलेल्या सीमांमुळे भारतातून इराक, सीरियातील प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोहोचणे अवघड झाले. सीरियातून परतलेल्या अरिब माजिदने इस्लामिक स्टेटचा खरा चेहरा भारतीय सुरक्षा यंत्रणे समोर ठेवला. भारतीय तरुणांची माथी भडकावून मोठी स्वप्ने दाखवून तिथे बोलावून घेतले जाते. पण त्यांना शारीरिकदृष्टय़ा अशक्त ठरवून हलकी कामे दिली जातात. प्रत्यक्ष लढण्याची संधी दिली जात नाही. त्यांचा वापर आत्मघातकी हल्ल्यांकरिता केला जातो. जखमी झाल्यास उपचार मिळत नाहीत. हे वास्तव जाणल्यानंतर उंबरठय़ावर असलेल्यांपैकी अनेक भारतीय तरुणांचे डोळे उघडले.

कल्याणपाठोपाठ केरळ, मुंबई आणि देशाच्या अन्य भागातून आरिबसारख्या तरुणांना इस्लामिक स्टेटचे म्होरके इंटरनेटच्या माध्यमातून हेरू लागले. त्यांची माथी भडकावू लागले. त्यांना सीरियातील युद्धात लढण्याच्या नावाखाली बोलावून घेऊ  लागले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दहशतवादविरोधी यंत्रणांनी सायबर हालचालींवर लक्ष वाढवले. देशभर धरपकड सुरू झाली. दुसरीकडे माथी भडकलेल्या आणि देश सोडण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात यंत्रणांनी धर्मगुरूंना सोबत घेतले. इतक्यावर न थांबता मुख्य प्रवाहात आलेल्या तरुण स्वत:च्या पायावर उभे राहतील अशी व्यवस्था केली.

या परिस्थितीत इस्लामिक स्टेटच्या लढय़ात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी देश सोडणाऱ्या तरुणांची संख्या घटली. पीछेहाट सुरू झाल्यानंतर इस्लामिक स्टेटने आपली व्यूहरचना बदलली. इंटरनेटच्या माध्यमातून संघटनेचे उद्देश, विखारी प्रचार, माथी भडकावण्याचा उद्योग पूर्वीसारखाच सुरू आहे. फक्त भडकलेल्या तरुणांना थेट आपल्यापर्यंत बोलावण्याऐवजी स्वत:ला सिद्ध करण्याची अट घातली जाते. एकटय़ाने किंवा संविचारी गटाने मोठा घातपात घडवा, त्यानंतरच इथे येता येईल, ही सूचना दिली जाऊ  लागली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एकल हल्ल्यांचा (लोन वूल्फ) किंवा बॉम्बस्फोटांप्रमाणे दहशतवादी कृतीचा धोका आणखी वाढला आहे.

महाराष्ट्रात एटीएसने आणि दिल्ली-उत्तर प्रदेशात एनआयएने अलीकडेच केलेल्या कारवायांमधून हा धोका पुन्हा अधोरेखित झाला. एनआयएने अटक केलेल्या तरुणांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थी, मौलानाचा समावेश आहे. या गटाकडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके आणि आयईडी (बॉम्ब) बनवण्याचे साहित्य हस्तगत झाले. महाराष्ट्रातील गट पाणी किंवा अन्नात विष कालवून घातपाताच्या बेतात होता. दोन्ही गटांचा म्होरक्या इस्लामिक स्टेटच्या  संपर्कात होता. महाराष्ट्रातील गटाकडून दक्षिण भारतातील कट्टरपंथीय सामाजिक संस्थेची पुस्तिका हस्तगत झाली. या संस्थेने मुंब्रा भागात अनेक सभा, बैठका घेतल्या, उपक्रम राबविल्याची माहिती या गटाने एटीएसला दिली आहे. बंदी आल्यानंतर ‘सिमी’चे बहुतांश कार्यकर्ते या संस्थेशी संलग्न झाल्याचा आरोप आहे.

जमेची बाब ही की आयसिस प्रेरित एकही गट आपल्या घातक योजनांमध्ये यशस्वी ठरलेला नाही. कृती आधीच हे गट गजांआड झाले. भविष्यात हेच चित्र राहील याची शाश्वती सुरक्षा यंत्रणा देत नाहीत. अनुभवी अधिकारी सांगतात त्यानुसार पोलिसांप्रमाणे समाज आणि कुटुंबाची जबाबदारी वाढली आहे. इंटरनेटवर माथी भडकावणारे विपुल साहित्य आहे. भावनिक तरुण सहज त्याकडे आकर्षित होतात. या प्रक्रियेत एक पाऊल पुढे टाकणारे तरुण हेरून त्यांची माथी भडकवली जातात. पहिल्यांदा तर त्यांना कुटुंबापासून, समाजापासून तोडले जाते. एकल केले जाते. ते बोलतात पण समविचार कारणाऱ्यांशीच. हळूहळू जिहादी विचारांचे विष भिनवून ते धर्मासाठी कोणत्याही थराला जातील अशी व्यवस्था केली जाते. आपल्या मुलाच्या, मित्राच्या, विद्यार्थ्यांच्या वागण्यातला बदल हेरणे, तो कोणाच्या संपर्कात आहे याची खातरजमा वेळीच करणे, आवश्यकता भासल्यास पोलीस किंवा समुपदेशकाची मदत घेणे ही जबाबदारी कुटुंबाने, समाजाने घ्यायला हवी. पडद्याआड राहून माथी भडकावण्याचे प्रयत्न पुढे सुरू राहणार, कदाचित आक्रमकरीत्या तसे प्रयत्न होतील, तसे झाल्यास फक्त पोलीस ते थोपवू शकणार नाहीत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:19 am

Web Title: the responsibility of society and family too
Next Stories
1 रवी पुजारी गँगच्या दोघांना पोलीस कोठडी
2 मुंबई: भाडेकरूंनी 125 वर्ष जुन्या चाळीचं घेतलं अंतिम दर्शन
3 ‘महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि रहाणार’
Just Now!
X