मोटरमन हा लोकलचे सारथ्य करणारा महत्त्वाचा घटक असतो, पण गार्डने इशारा दिल्याशिवाय तोदेखील गाडी चालू करू शकत नाही. वेगमर्यादा, प्रवासी गाडीत चढले की नाही अशा अनेक गोष्टींची काळजी गार्डच घेतो. खऱ्या अर्थाने गाडीचे सारथ्य गार्डकडेच असते..

मराठीत बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेला एक वेगळेच स्थान आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेतून ‘जीवन त्यांना कळले हो’ अशाच प्रकारची अनुभूती येते. आता ‘दळण’ आणि ‘वळण’ या सदरात मर्ढेकरांच्या कवितेचे काय काम, असा प्रश्न एखाद्या दारावर लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मनाला खाडीवरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यासारखा स्पर्श करून गेलाही असेल. पण मर्ढेकरांनी त्यांच्या ‘फलाटदादा फलाटदादा’ या कवितेत तुमच्या आमच्या रेल्वेचं खुसखुशीत वर्णन केलं आहे. त्याच कवितेतील एका ओळीत मर्ढेकर अक्षरश: जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान सांगतात. ती ओळ म्हणजे ‘हर गार्डाची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात..’ जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून ही ओळ चांगली असली, तरी उपनगरीय रेल्वेमार्गावर लोकलमध्ये गार्ड म्हणून काम करणाऱ्यांच्या तोंडी एकच ‘शिट्टी’ असते.

गाडीचा गार्ड हा रेल्वेविषयी जिव्हाळा असलेल्यांसाठीही कुतूहलाचा विषय असतो. मोटरमन किंवा इंजिन ड्रायव्हर (आताच्या रेल्वेच्या भाषेत लोको पायलट) यांना एक प्रकारचे ‘ग्लॅमर’ असते. आता नाहीत, पण पूर्वी वाफेवर किंवा कोळशाची इंजिने होती, त्या वेळी बाजूची खिट्टी खेचून इंजिनाच्या शिटय़ा काढणारा इंजिन ड्रायव्हर हा अनेकांचा आदर्शच होता. त्याच्या त्या इंजिनात चढून एकदा तरी जोरदार शिटी वाजवावी, हे कोणत्याही लहान मुलाचे स्वप्न असते. त्या मानाने  इंजिनाच्या मागून एखाद्या लोढण्यासारख्या जाणाऱ्या डब्यांच्या सगळ्यात शेवटी एका केबिनमधून हिरवा झेंडा बाहेर काढून उभा असलेला गार्ड मात्र दुर्लक्षितच राहतो. तसं बघायला गेलं, तर गाडी चालवण्यात मोटरमन किंवा लोको पायलटएवढीच महत्त्वाची भूमिका गार्ड बजावत असतो.

मोटरमनप्रमाणेच गार्ड कामावर आल्यावर ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे त्याची चाचणी घेतली जाते. त्यानंतर त्याने व्यवस्थित आणि पुरेशी झोप घेतली आहे किंवा नाही, याबाबत चौकशी केली जाते. हे सोपस्कार पार पडल्यानंतर त्याला त्या दिवशी मार्गावर असलेल्या सगळ्या वेगमर्यादांचा तक्ता दिला जातो. रेल्वेमार्गावर कुठे काम चालू असेल किंवा प्रवासी वाहतुकीसाठी एखादा भाग धोकादायक असेल, तर अशा ठिकाणी या वेगमर्यादा लावल्या जातात. हा वेगमर्यादांचा तक्ता घेऊन गार्ड आपल्या कामासाठी आपल्या केबिनकडे जातो.

प्रवास करताना मोटरमन किंवा गार्डच्या केबिनच्या अगदी मागच्याच डब्यात असाल, तर अनेकदा ‘पॉम्पऽऽऽ’ अशा भोंग्यानंतर ‘टिंग् टिंग्’ अशी दोन वेळा घंटी वाजलेली ऐकू येते. गार्ड आणि मोटरमन यांच्यातल्या या सांकेतिक खुणा असतात. नेहमीच्या वापरासाठी अशा चार खुणा असतात. अनेकदा एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत (रेल्वेच्या परिभाषेत सेक्शनमधील किलोमीटर अमुक अमुकपासून किलोमीटर तमुक तमुकपर्यंत) वेगमर्यादा असेल, तर ती वेगमर्यादा सुरू होण्याआधी एक घंटी वाजवून गार्ड मोटरमनला सूचित करतो. मोटरमनकडे चार्ट असतोच, पण गार्डही त्याला सूचना देतो. आपत्कालीन परिस्थितीत आणखी वेगवेगळ्या प्रकारचे संकेत घंटीद्वारे गार्ड आणि मोटरमन एकमेकांना देतात. आता दोघेही अंतर्गत संभाषण प्रणालीद्वारे एकमेकांशी बोलू शकत असले, तरी अजूनही घंटीचे हे संकेत पाळले जातात.

मोटरमनचे काम गाडी चालवणे आहे. पण गाडी चालताना प्रवासी सुरक्षा आणि संपूर्ण गाडीची सुरक्षा हे गार्डचे काम आहे. गाडी प्लॅटफॉर्मला लागली की, गार्ड आपल्या केबिनच्या दरवाज्यात येऊन उभा राहिलेला दिसतो. त्या वेळी प्रवासी गाडीत चढले की नाहीत, काही धावपळ नाही ना, आदी गोष्टी बघत असतो. त्याच्या दृष्टीने प्रवासी गाडीत सुरक्षितपणे चढल्याचे त्याला आढळल्याशिवाय तो मोटरमनला गाडी सोडण्याचा संकेत देत नाही. मोटरमनने गाडी सुरू केली, तरी आपत्कालीन परिस्थितीत ती थांबवण्याचा संकेतही गार्डच देतो.

अनेकदा रूळ ओलांडताना अपघात होतो आणि एखादी व्यक्ती गाडीखाली येते. त्यापैकी बहुतांश घटना या आत्महत्येच्या असतात. अशा वेळी मोटरमन ती प्रत्यक्ष टक्कर बघत असतो. त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतातच. पण गाडी थांबल्यावर गाडीखाली कोणी आले आहे का, असल्यास कितपत जखमी आहे, वैद्यकीय मदत कशी द्यायची, याची चाचपणी गार्डला करावी लागते. दोन स्थानकांच्या मध्ये काळोखात गाडी थांबलेली असते. गार्ड खाली उतरून विजेरीच्या साहाय्याने प्रत्येक डब्याखाली बघत जातो. एखादी व्यक्ती जखमी असेल, तर प्रवाशांच्या साहाय्याने तिला गाडीत चढवतो आणि पुढील स्थानकातील स्टेशन अधीक्षकांना त्याबाबत सूचित करतो.

मोटरमन गाडी सोडून कधीच जाऊ शकत नाही. त्यामुळे गार्डलाच आणीबाणीच्या प्रसंगात गाडी सोडून बाहेरच्या गोष्टींचा ताबा घ्यावा लागतो. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड आला, एखाद्या ठिकाणी रुळाला तडा गेला किंवा काही विचित्र गोष्ट जाणवली, तर त्याची कल्पना नियंत्रण कक्ष व संबंधित स्थानक अधीक्षकाला देण्याची जबाबदारी गार्डची असते. गाडी एखाद्या ठिकाणी अचानक थांबली किंवा एखाद्या स्थानकात नियोजित वेळेपेक्षा जास्त थांबली, तर नियंत्रण कक्षातून गार्डला विचारणा होते. त्याने निर्णय घेऊन ती गाडी पुढे नेणे अपेक्षित असते. अशा वेळी गाडी पुढे कधी न्यायची, याची सूचनाही गार्डच मोटरमनला देत असतो.

पहिल्या डब्यातील केबिनमध्ये बसून गाडी चालवणाऱ्या मोटरमनला त्याच्या मागच्या ११ डब्यांची परिस्थिती माहीत नसते. पण शेवटच्या डब्याच्याही टोकाला असलेल्या गार्डला त्याच्या संपूर्ण गाडीची स्थिती माहिती असणे आवश्यक मानले जाते. एखाद्या वेळी एखाद्या प्रवाशाने साखळी खेचली, तर ती का खेचली, याची नोंद गार्डच करतो. त्यासाठी त्याला साखळी खेचलेल्या डब्यापर्यंत चालत जावे लागते.

रेल्वे यंत्रणेतील गार्डचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चित्रपटात कॅमेऱ्याच्या पुढे उभ्या असलेल्या कलाकाराला प्रसिद्धी मिळते, पण तो कॅमेरा हाताळणारा कॅमेरामन दुर्लक्षित राहतो. गार्डचीही तीच अवस्था आहे. उपनगरीय लोकलमध्ये गार्डचे काम करणाऱ्यांना सहा तासांची डय़ुटी असते. पण अनेकदा त्यांना जास्त वेळही काम करावे लागते. पण खरी कसरत असते ती मालगाडीच्या गार्डची! देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सामान वाहून नेणारी ती गाडी.. त्या गाडीचे ५०-५० डबे.. त्या डब्यांच्या सर्वात शेवटी गार्डचा डबा.. रात्रीच्या वेळी त्या डब्यात एखादा कंदील लुकलुकत असतो आणि एखाद्या रेल्वे फाटकात उभ्या असलेल्या रक्षकाला हिरवी विजेरी दाखवून ‘ऑल क्लिअर’ असल्याचा संदेश देणारा गार्डचा हात तेवढा दिसतो.. हर गार्डाचा एकच हात!

रोहन टिल्लू –  tohan.tillu@expressindia.com

@rohantillu