वारंवार तक्रार करूनही मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या छताचा काही भाग गुरुवारी सायंकाळी कोसळला. या इमारतीच्या अवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यापीठाच्या प्रशासनाचा बेभरवशी कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

विद्यापीठाच्या कलिना येथील शैक्षणिक संकुलात असलेली परीक्षा विभागाची इमारत ही विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सातत्याने वर्दळ असलेली इमारत आहे. परीक्षा विभागाच्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी सायंकाळी कोसळला. सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही इजा झाली नाही.

विद्यापीठाच्या बेपर्वा कारभाराचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. परीक्षा विभागाच्या इमारतीबाबत अधिसभेत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिले. मात्र, चार महिने फारशी हालचाल विद्यापीठाने केली नाही. परीक्षा विभागाच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत विद्यापीठाकडे अधिकार मंडळांचे सदस्य, संघटना यांनी तक्रार केल्या होत्या. परीक्षा विभागासाठी नवी इमारत विद्यापीठाने बांधली आहे. मात्र, तेथे परीक्षा विभागाचे स्थलांतर करण्यात आलेले नाही.

अनेक इमारती धोकादायक

विद्यापीठातील अनेक इमारती धोकादायक आहेत. गेल्या वर्षभरात विद्यापीठाच्या आवारातील, वसतिगृहाच्या इमारतींची पडझड होण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटनांमध्ये विद्यार्थ्यांनाही इजा झाली होती. कलिना येथील रानडे भवनच्या इमारतीचे छत गेल्या वर्षी कोसळले. त्यात तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. चर्चगेट येथील जगन्नाथ शंकरशेठ वसतिगृहाच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्यातही एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला होता. विद्यार्थ्यांच्या लॅपटॉप आणि इतर साहित्याचेही नुकसान झाले होते. जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या मुलींच्या स्वच्छतागृहाचीही पडझड झाली. दरम्यान विद्यापीठाच्या खानावळीच्या छताचाही काही भाग पडला होता. या सर्व घटना घडण्यापूर्वी इमारतींच्या दुरवस्थेची तक्रार संघटनांनी प्रशासनाकडे केली होती.

‘विद्यापीठाच्या इमारती धोकादायक आहेत. यातील अनेक इमारतींमध्ये किंवा त्या परिसरात हजारो विद्यार्थ्यांचा वावर असतो. याबाबत अधिसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी आश्वासन देऊनही विद्यापीठाच्या प्रशासनाने काहीच केले नाही. अधिकार मंडळाच्या सदस्यांनी तक्रारी करूनही विद्यापीठ त्या गांभीर्याने घेत नाही.’

– शीतल शेठ देवरुखकर, अधिसभा सदस्य.