पत्नीचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कुर्ला येथे चौघांनी एका तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण करत आरोपींनी त्याच्या बदनामीचाही प्रयत्न केला. मात्र तरुणाच्या मित्रांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

राजस्थानमधील अजमेर येथे राहणाऱ्या विशाल जैलंया (वय २६) याची तीन वर्षांपूर्वी त्याच्याच गावातील १९ वर्षांच्या तरुणीशी ओळख झाली होती. काही दिवस या दोघांमध्ये प्रेमसंबंधही होते. मात्र दोन वर्षांपूर्वी तरुणीचा विवाह टिनू सुहामिया या तरुणाशी झाला. लग्नानंतर तरुणी पती टिनूसह कुर्ला नेहरूनगर येथे राहत होती. याच दरम्यान विशालही कामानिमित्त मुंबईत आला. तोही याच परिसरात राहत होता. याचवेळी विशालविषयी माहिती आरोपीला काही मित्रांकडून मिळाली.

यावेळी विशाल याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असतील, असा संशय बाळगून आरोपीने विशालला कायमचा धडा शिकविण्यासाठी एक योजना आखली. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी या आरोपीच्या मित्रांनी विशालला गाठून काही काम असल्याचे सांगत त्याला टिनूच्या घरी आणले.

पत्नीची छेड काढत असल्याचे दाखविण्यासाठी पत्नीकडून त्याला चपलांनी मारहाण केली. शिवाय या मारहाणीचे चित्रीकरण या आरोपींनी मोबाइलमध्ये ध्वनिमुद्रित केले. त्यानंतर विशालचे सर्व कपडे काढून त्याला नग्न करत जबर मारहाण केली. नग्न अवस्थेमध्येदेखील त्याचे चित्रीकरण करत त्याला मुंबई सोडून जाण्याची धमकी या आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी नग्न अवस्थेमधील चित्रीकरण समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ केले.

मारहाणीनंतर विशाल त्याच्या खोलीवर आला. मित्राची ही अवस्था पाहून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र भीतीपोटी त्याने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दोन दिवसांनंतर विशालने घरी स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला नेहरूनगर पोलीस ठाण्यात नेले. घडलेल्या प्रसंगाबाबत कुर्ला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर विशालने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामध्ये टिनूसह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.