सध्या मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून चाललेल्या राजकारणाचा उपसर्ग थेट चित्रपटसृष्टीविषयक लेखनाची प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या इसाक मुजावर यांना पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी मुजावर यांना झालेल्या अपघातानंतर महामंडळाने त्यांच्याकडे मदतीचा धनादेश पाठवला होता. मात्र हा धनादेश पाठवण्याला लोकांनी हरकत घेत आपला राजीनामा मागितल्याचे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी आपल्याला दूरध्वनीवरून सांगितल्याचा दावा मुजावर यांनी केला आहे. याबाबत आपण चौकशी केली असता सुर्वे धादांत खोटे बोलत असल्याचे लक्षात आले. मात्र तसाच प्रकार असेल, तर आपण आपल्याला मिळालेली मदत महामंडळाला परत करायला तयार आहोत, असेही मुजावर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका अपघातात मुजावर यांना दुखापत झाली होती. ते २४ दिवस रुग्णालयात दाखल होते. त्या वेळी महामंडळातून त्यांना दूरध्वनी करण्यात आला. महामंडळ तुमच्यासाठी मदतीचा धनादेश पाठवत असून तो कोणत्या पत्त्यावर पाठवायचा, हे विचारण्यासाठी त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे मुजावर म्हणाले. ही मदत मिळाली, मात्र त्या वेळी सुर्वे यांनी मुजावर यांना दूरध्वनी करून कोणतीही चौकशी केली नव्हती.काही दिवसांपूर्वी विरोधकांनी सुर्वे यांच्याविरोधात रणकंदन माजवत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर सुर्वे यांनी मुजावर यांना दूरध्वनी केला. तुमच्या आजारपणात महामंडळाने तुम्हाला मदत केली, त्याला अनेक लोकांनी हरकत घेत माझा राजीनामा मागितला, असे सुर्वे यांनी मुजावर यांना सांगितले. हे ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे मुजावर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी काही मित्रांना दूरध्वनी केला असता आपल्याला मदत करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याचे कळले. त्यामुळे सुर्वे  धादांत खोटे बोलत असल्याचा दावा मुजावर यांनी केला आहे. महामंडळाने मदत करावी, असा कोणताही अर्ज आपण महामंडळाकडे केला नव्हता. तरीही महामंडळाने आपल्याला मदत केली. मात्र मदतीचे असे राजकारण केले जात असेल, तर ही मदत महामंडळाला परत करायला तयार आहोत, असे मुजावर म्हणाले.