मुंबई : शहरात पालिकेच्या रुग्णालयात प्राणवायूची फारशी कमतरता भासत नसली तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र अद्यापही प्राणवायूचा तुटवडाच आहे. याबाबत माहितीही रुग्णालयांकडून ऐनवेळी दिली जात असल्याने रुग्णांना स्थलांतरित करणे किंवा प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची तारांबळ उडत आहे.

घाटकोपरच्या हिंदूसभा रुग्णालयातील प्राणवायूच्या तुटवडय़ामुळे १३६ रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतर करण्याची आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर पालिकेने प्राणवायूचा पुरवठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती ठरवून दिली.

रुग्णालयाने प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे २४ तास आधी करावी. १६ तासांमध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास याबाबत पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला कळवावे, अशा सूचना दिल्या. परंतु अजूनही खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा वेळेत होत नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. सूचना देऊनही पालिकेला अवघ्या तीन ते चार तास आधी माहिती कळविली जाते. त्यामुळे या रुग्णालयांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाला धावपळ करावी लागत आहे.

‘रुग्णालयांना जितका प्राणवायू दरदिवशी मिळण्याची हमी असेल तितक्याच रुग्ण दाखल करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. १०० खाटांवरील मोठय़ा रुग्णालयांना तर आम्ही प्राणवायूचे प्रकल्प किंवा साठा करण्याच्या मोठय़ा टाक्या लावून घेण्याचीही सूचना दिली आहे. रुग्णालयांनी प्राणवायूची गरज असल्याचे साठा शिल्लक असतानाच कळविले तर पुरवठादाराच्या मागे लागून उपलब्ध करण्यासाठी काही कालावधी मिळतो’, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाकडून थंड प्रतिसाद

प्राणवायूचा साठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध नियमन प्रशासनाची आहे. परंतु यासाठी नियुक्त केलेल्या नियंत्रण कक्षाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही रुग्णालये पालिकेच्या विभागांकडेच धाव घेतात. या कक्षाशी समन्वय साधून मग पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा केला जातो. परंतु हे काम औषध प्रशासनाने केल्यास आमच्यावर ताण येणार नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

रुग्णालयांना प्राणवायू संपण्याआधी काही तास आधी सूचित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच पुरवठादारांसोबत करारही करून घेण्याचे सांगितले आहे जेणेकरून त्यांनी पुरवठा न केल्यास पालिकेला जाब विचारता येईल. प्राणवायूचा वापर काटकसरीने करा असेही रुग्णालयांना सांगितले आहे. त्यामुळे या तिन्ही बाबींचे पालन केल्यास प्राणवायूचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि यंत्रणेवरही ताण येणार नाही.

– सुरेश काकाणी, पालिकेचे  अतिरिक्त आयमुक्त