केंद्रीय गृहनिर्माण कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्याचे आवाहनविशेष

घरखरेदी करीत असाल तर नव्याने लागू झालेल्या केंद्रीय गृहनिर्माण कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करूनच मग घरखरेदीसाठी पैसे भरा, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी आकर्षक भेटवस्तू देऊन ग्राहकांना घरखरेदीसाठी भुरळ घातली जात आहे. अशा वेळी ग्राहकांनी या नव्या कायदाचा पुरेपूर उपयोग करून घेत विकासकाकडे विचारणा केल्यानंतरच घरखरेदी करावी म्हणजे भविष्यात संबंधित विकासकांकडून फसवणूक झाली तरी दाद मागण्याची संधी मिळू शकेल, याकडे पंचायतीने लक्ष वेधले आहे.

विकासकांनी अल्पावधीसाठी जाहीर केलेल्या योजनांना बळी न पडता नीट विचार करून घर घेण्याचे आवाहनही पंचायतीने केले आहे. नव्याने अस्तित्त्वात आलेल्या गृहनिर्माण कायद्यानुसार प्रत्येक विकासकाने त्याच्या प्रस्तावित प्रकल्पाची गृहनिर्माण प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी नोंदणी केल्याशिवाय विकासकाला त्याच्या प्रकल्पाची जाहिरातही करण्यावरही बंदी आहे. प्राधिकरणाकडे नोंदणी करताना विकासकाला संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक असलेले बांधकाम परवाने पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे घरखरेदी करताना ग्राहकांनी ज्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असते ती कागदपत्रे प्राधिकरणाकडून शहानिशा होऊन मगच प्रकल्पाची नोंदणी होणार आहे. त्यामुळे अशा नोंदणीकृत प्रकल्पात घर खरेदी करणे अधिक सुरक्षित व ग्राहकांसाठी हितावह ठरणार असल्याचेही पंचायतीने स्पष्ट केले आहे.

नव्या कायद्यात घराचा ताबा देण्याच्या होणाऱ्या अमर्याद विलंबावरही अंकुश ठेवण्यात आला आहे. त्यातही विलंब झाला तर ग्राहकाला  न्यायालयाची पायरी न चढताही व्याज मिळू शकणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण कायद्याची अमलबजावणी तातडीने करण्याची विनंती ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांकडे केली आहे. नागरिकांनीही मुख्यमंत्र्यांवर ईमेलद्वारे दबाव आणावा, असे आवाहन ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे आणि वर्षां राऊत यांनी केले आहे.