मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांच्या मुळाशी अतिवेग हेच मुख्य कारण असल्याचा हा रस्ता बांधणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चा निष्कर्ष आहे. अतिवेगात निघालेल्या गाडय़ांची नोंद करण्यासाठी ‘स्पीडगन’चा प्रयोग झाला, पण त्यासाठी ठिकठिकाणी मनुष्यबळ सतत तैनात ठेवावे लागते. त्याऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत ‘ई-सव्‍‌र्हिलन्स’ विचार सुरू झाला आहे.
त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशांच्या पहिल्या टोलनाक्यावर ‘इलेक्ट्रॉनिक चीप’ वाहनांना द्यायची. महामार्गावर कॅमेरे बसवायचे. कॅमेरे हे केंद्रीय यंत्रणेला जोडायचे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गाडीचा तपशील त्या ‘चीप’मुळे कॅमेऱ्यात बंदिस्त होईल व ती माहिती केंद्रीय यंत्रणेत नोंदवली जाईल. पुढच्या टोलनाक्यावर अशा वाहनांवर मोठा दंड आकारायचा. त्यामुळे दंडाच्या धास्तीने वेगमर्यादेवर नियंत्रण येऊ शकेल. शेवटच्या टोलनाक्यावर वाहनधारकाकडून ती चीप काढून घ्यायची, अशी योजना विचाराधीन असून त्याचा प्रयोग दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान  ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना दाखवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ही यंत्रणा संपूर्ण महामार्गावर बसवण्याचा विचार सुरू आहे.
त्याचबरोबर गाडी डिव्हायडरला धडकून होणाऱ्या अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी ‘ब्रिफेन रोप’ बसवण्याचाही विचार सुरू आहे. या दोरखंडांमुळे गाडी आदळली तरी अपघाताची तीव्रता कमी असेल. गाडीला दिशा देऊन पुन्हा आहे त्या रस्त्यावर येऊ शकते. कामशेत ते तळेगाव हा आठ किलोमीटरचा सरळ रस्त्याचा पट्टा आहे. वळण नसल्याने या पट्टय़ात गाडीचा वेग वाढवला जातो. त्यातूनच नियंत्रण सुटून अपघात होतात. या पट्टय़ात असे दोरखंड बसवण्याचा विचार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.