सचिन पिळगावकरांच्या कारकिर्दीचा आढावा

बालअभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर अभिनयाची कारकीर्द सुरू केलेल्या अभिनेता सचिन यांच्या मराठी व हिंदी रुपेरी पडद्यावरील अभिनय प्रवासाला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘कटय़ार काळजात घुसली’या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले. सचिन यांच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी अभिनय मुंबई इव्हेंट्स अ‍ॅण्ड प्रॉडक्शनतर्फे ‘कल आज अ‍ॅण्ड फॉरएव्हर’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘एव्हरग्रीन सचिन शो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सशुल्क आहे.

* कधी- शुक्रवार, १६ सप्टेंबर २०१६

* कुठे- भाईदास ऑडिटोरियम, विलेपार्ले (पश्चिम)

* केव्हा- रात्री साडेसात वाजता

पियानोच्या सुरावटींवर संध्याकाळ

वाद्यसंगीतात ‘पियानो’ या वाद्याचे एक वेगळे महत्त्व आहे. भला मोठा पियानो, आजूबाजूला जमलेली मंडळी आणि पियानो वाजवत गाणे म्हणणारा नायक आपण अनेक हिंदी चित्रपटातून पाहिला आहे. पियानोवादकांप्रमाणेच ‘कीबोर्ड’ आर्टिस्टही तेवढेच महत्त्वाचे आहेत. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट अर्थात ‘एनसीपीए’तर्फे ‘मुंबई पियानो डे’आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत पियानो आणि कीबोर्ड वादक कलाकार सहभागी होणार आहेत. यात लुईस बॅंक्स, अनुराग नायडू, संगीत हळदीपूर, कश्यप अय्यंगार, सौरभ सुमन आणि अन्य वादकांचा समावेश आहे. श्रोत्यांना यांचे पियानोवादन तसेच काही लोकप्रिय सुरावटी ऐकायला मिळणार असून हा कार्यक्रम सशुल्क आहे.

* कधी- शनिवार, १० सप्टेंबर २०१६

* कुठे- एनसीपीए, टाटा थिएटर, नरिमन पॉइंट, मुंबई

* केव्हा- सायंकाळी सात वाजता.

अनुपम खेर म्हणतात ‘कुछ भी हो सकता है’

एक अष्टपैलू अभिनेता म्हणून अनुपम खेर यांची ओळख आहे. ‘सारांश’ चित्रपटापासून त्यांची बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावरची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. खेर यांच्याच जीवनावर आधारित असलेला ‘कुछ भी होता है’ हा कार्यक्रम ते सादर करतात. याचे लेखन अशोक पाटोळे यांचे तर दिग्दर्शन फिरोज खान यांचे आहे. मुंबईसह देशभरात तसेच परदेशातही खेर यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे. काश्मिरी पंडित असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुपम खेर यांचा जीवनप्रवास दस्तुरखुद्द त्यांच्याच तोंडून रसिकांना ऐकायला मिळणार आहे. कार्यक्रम सशुल्क आहे.

* कधी- शुक्रवार, ९ सप्टेंबर २०१६

* कठे- सेंट अँड्रज ऑडिटोरियम, वांद्रे (पश्चिम)

* केव्हा-रात्री साडेसात वाजता

‘वयात येताना’

‘वयात येताना’ हा टप्पा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. काही वर्षांपूर्वी ‘वयात’ आलेले आता ‘आई- बाबा’च्या भूमिकेत असतात. ‘वयात’ येणाऱ्या आपल्या पाल्यांना कसे समजून घ्यायचे, त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची अशा संभ्रमात ते असतात. तर ‘वयात’ येणाऱ्या मुला-मुलींनाही वेगवेगळे प्रश्न सतावीत असतात. त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल घडत असतात. या सगळ्यांना दोघांनीही म्हणजे पालक व पाल्यांनी कसे सामोरे जायचे? काय काळजी घ्यायची यावर मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘वयात येताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कधी- शनिवार, १० सप्टेंबर २०१६

* कुठे- मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, शीव, चुनाभट्टी

* केव्हा- दुपारी दोन वाजता

रफी आणि आशाची द्वंद्वगीते

* अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘बहोत शुक्रिया’ ही व या सारखी अनेक अवीट गाणी पाश्र्वगायक मोहंमद रफी आणि आशा भोसले यांनी गायली आहेत. या गाण्यांचे गारुड आजही श्रोत्यांच्या मनावर आहे. हिंदी वाद्यवृंदातून ही गाणी आजही ‘वन्समोअर’ घेतात. या गाण्यांच्या स्मरणरंजनात रंगून जायचा योग पुन्हा एकदा जुळून आला आहे. नौशाद संगीत समितीने रफी आणि आशा यांच्या द्वंद्वगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संगीतप्रेमी रसिकांसाठी ती पर्वणी आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

* कधी- रविवार, ११ सप्टेंबर २०१६

* कुठे- ओनर्स कॉलनी हॉल, मिनी पंजाबसमोर, गुरू तेजबहाद्दूरनगर, षण्मुखानंद सभागृहाजवळ.

* केव्हा- सायंकाळी सहा वाजता

संकलन : शेखर जोशी

shekhar.joshi@expressindia.com

@ shejo66