मुंबईला हादरवून सोडणाऱ्या कांदिवलीतल्या हेमा उपाध्याय दुहेरी हत्याकांड प्रकरणात आणखी तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. हेमा यांची पैशांच्या व्यवहारातून तर भंबानी हे त्या वेळी उपस्थित असल्याने त्यांची हत्या केली असल्याची कबुली प्रदीप राजभर, विजय राजभर आणि आझाद राजभर या तिघांनी दिली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्याधर राजधर हा मोकाट असून पोलीस त्याचा तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. या तिन्ही आरोपींना मंगळवारी बोरिवली येथील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हेमा उपाध्याय या चित्रकलेसाठी आवश्यक असणारे साहित्य राजभर यांच्या कांदिवली येथील कारखान्यातून मागवत असत. गेल्या अनेक वर्षांचा परिचय असल्याने राजभर यांना कित्येकदा ओळखीवर साहित्य देत असत. यातून तब्बल पाच लाख रुपयांची थकबाकी हेमा यांच्याकडून येणे बाकी होते. या रकमेची मागणी केल्यानंतर हेमा व राजभर यांच्यात वाद झाले. राजभर यांनी याच वादातून हेमा यांची हत्या केली. त्याच वेळी भंबानीही उपस्थित असल्याने त्यांचीही हत्या करावी लागल्याची कबुली या तिघांनी दिल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, एका टेम्पोचालकाला दोघांचे मृतदेह खोक्यात ठेवून कचरा असल्याचे सांगून कांदिवलीच्या नाल्यात टाकण्यास सांगितले. यात या चालकाने पुढकार घेऊन पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी सोमवारी शिवकुमार ऊर्फ साधू राजभर याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली.

हेमाच्या चेहऱ्यावर, भंबानींच्या छातीवर जखमा
न्याय वैद्यकीय अहवालानुसार हेमा उपाध्याय आणि भंबानी यांचा मृत्यू जखमांमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे खून तोंड दाबून केल्याच्या पोलिसांच्या प्राथमिक अंदाजाला तडा गेल्याचे सूत्रांनी सांगितले. हेमा उपाध्याय यांच्या चेहऱ्यावर तर भंबानी यांच्या छातीवर जखमा झाल्या होत्या. धारदार आणि जड वस्तूंनी हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र रासायनिक विश्लेषणाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय मृत्यूचे कारण गुप्त ठेवण्यात आले आहे. याशिवाय भंबानी यांच्या तोंडात बोळा कोंबून तोंडाला, हाताला आणि पायाला टेप लावण्यात आली होती. हेमा यांचा चेहरा भंबानींपेक्षा अधिक सुजलेला होता असे सूत्रांनी सांगितले.