परतीच्या पावसाने महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये चांगलाच जोर दाखवला आहे. मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत. तर पालघर, ठाणे, कल्याण आणि पनवेल भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतो आहे. IMD अर्थात भारतीय हवामान विभागानेही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. पुढचे चार तास पाऊस पडेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. त्यानुसार हा पाऊस पडतोच आहे. सामान्यत: ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पडणारा पाऊस यंदा कमी होऊन ८९ मिमी इतकाच पडला. पण दरवर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होणारा परतीचा पाऊस यंदा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने मागच्याच आठवड्यात वर्तवला होता. मागाच्या आठवड्यातही मुंबई आणि उपनगरांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. परतीच्या पावसाने मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांची दैना उडवली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.