मुंबईकरांची भूक भागविणाऱ्या वडापावला आव्हान देत तरुणाईच्या जिभेला खुणावणाऱ्या चटकदार फ्रँकीने खवय्यांना खूश केले आहे. महाराष्ट्रातील घराघरात लहानपणापासून दिली जाणारी तूप-साखर-पोळी, आखाती प्रदेशात मूळ असणारा श्वारमा, कलकत्त्याची खासियत असलेला काठी रोल या प्रकारातूनच उदयाला आलेली फ्रँकी प्लॅटफॉर्मवर उभे असताना, रस्त्यावर चालताना अगदी कुठेही खाता येऊ शकते.

दादरच्या शिवाजी पार्कातील पोवार यांच्या ‘टिब्स’ फ्रँकीने खवय्यांना ‘फ्रँकीप्रेमी’ बनविले आहे. सकाळी पार्कात चालण्यासाठी येणारे आजी-आजोबाही घरातल्यांना चुकवून येथील फ्रँकीवर ताव मारून चवीबरोबरच काही कॅलरीजही घेऊन जातात. तर दुकानाच्या मागच्या बाजूला बालमोहन शाळा, उजवीकडे रस्त्याच्या पलीकडे रूपारेल आणि डावीकडे कीर्ती महाविद्यालयातील मंडळी पार्कात आल्यावर या फ्रँकीची आवर्जून चव घेतात. येथील ‘चिकन तंदुरी तडका फ्रँकी’ आणि ‘मटण फ्रँकी’ खवय्यांच्या विशेष आवडीची. तर शाकाहारींमध्ये ‘टँगी मेओनिस फ्रँकी’ आणि ‘पनीर तंदुरी तडका फ्रँकी’ला जास्त मागणी आहे. शिवाजी पार्कात अनेक खाद्यपदार्थाची दुकाने नव्याने सुरू झाली आहे. मात्र पोवारांची ‘टिब्स फ्रँकी’ गेली २४ वर्षे आपले महत्त्व जपून आहे.

या फ्रँकी बनविताना बघण्याची मजा काही वेगळीच असते. तेलाने थपथपलेल्या मैद्याच्या पोळीला खरपूस भाजून त्यावर अंड टाकल्यावर पांढऱ्याशुभ्र पोळीला छान तपकिरी रंग येतो. यानंतर दुसरीकडे त्याच तव्यावर दुसऱ्या फ्रँकीची जय्यत तयारी सुरू असते. अंड शिजल्यावर चिकनच्या तयार सारणातून काही चिकनचे तुकडे सरळ रांगेत लावले जाते. व्हिनेगरमध्ये हिरव्या मिरच्या कापून ठेवलेलं पाणी हळूहळू या सारणावर सोडले जाते. यानंतर खरी मजा असते फ्रँकीच्या विशेष मसाल्याची. प्रत्येक फ्रँकीच्या दुकानातील मसाल्याची चव वेगळी असते. याचे गुपित सांगितले जात नाही. फ्रँकी मसाल्यानंतर वेळ येते कांद्याची. वरून भरपूर कांदा घालून ही फ्रँकी खाण्यासाठी तयार होते. कुठल्याही फ्रँकीची मजा ती अर्धी खाल्ल्यानंतर येते. सुरुवातीचा पोळीचा कोरडा भाग संपल्यानंतर मधल्या भागातील चिकनचे तुकडे दाताखाली येताना समाधानाने ऊर भरून येतो. शाकाहारींनाही हीच मजा लुटायची असेल तर ‘टँगी मेओनिस फ्रँकी’ची ऑर्डर द्यावी लागेल. बटाटय़ाचे सारण घातलेला भारदस्त आडवा वडा पोळीवर विराजमान होतो. त्यानंतर त्यावर मेओनिजचा थर चढविला जातो. सोन्याच्या दागिन्यांना मुलामा द्यावा त्याप्रमाणे बटाटय़ाच्या वडय़ावर या मेओनीजचे कवच पाहून खवय्यांच्या तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल. त्यावर भरपूर कांद्याचा मारा केल्यानंतर शाकाहारींसाठी मेओनिज फ्रँकी तयार. व्हिनेगरची आंबट चव, चिकन किंवा बटाटा वडय़ाचा काहीसा तिखट मसाला, अधूनमधून दाताखाली येणारा कांदा आणि गरमागरम पोळी यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे ‘अन्न हे पूर्णब्रह्म असे वाटण्याशिवाय राहणार नाही. फ्रँकी खाल्ल्यानंतर पोटाला थंडावा मिळावा यासाठी विविध प्रकारचे सरबत किंवा अगदीच आईस्क्रीम तुमची वाट पाहतच असतात.

पोवार यांच्या फ्रँकीच्या दुकानात सॅण्डविच, बर्गर यासारखे अनेक पदार्थ उपलब्ध आहे. मात्र फ्रँकीचा दराराच इतका आहे, की इतर पदार्थापेक्षा तरुण फ्रँकीकडे ओढले जातात. १९९२ पासून या दुकानाचे मालक योगेश पोवार दादरकरांना फ्रँकी पुरवीत आहे. यापूर्वी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणून मैद्याऐवजी गव्हाची पोळी सुरू करण्यात आली होती. मात्र खवय्यांकडून चांगला प्रतिसाद न आल्याने पुन्हा मैद्याची पोळी सुरू झाली. शिवाजी पार्क हा तरुणांचा कट्टा आहे. त्यामुळे कायम या भागात गजबज असते. अशा वातावरणात फ्रँकीचा खप चांगला होतो, असे पोवार यांनी सांगितले. येथे व्हेज फ्रँकी ८० रुपये तर चिकन फ्रँकी ९० रुपयांना मिळते आणि विशेष ‘चिकन तंदुरी तडका फ्रँकी’साठी १४० रुपये आणि ‘पनीर तंदुर फ्रँकी’साठी १२० रुपये मोजावे लागतात.

  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत.
  • कुठे – टिब्स फ्रँकी, शिवाजी पार्क, बालमोहन शाळेच्या शेजारी, केळूसकर रोड, दादर (पू), मुंबई</li>