भगवानगडावरील दसरा मेळाव्यानिमित्त निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गडाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. गडाच्या परिसरात आज, रविवारी तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी आज गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. भेटीचा तपशील समजू शकला नाही.

गडाच्या परिसरातील बंदोबस्ताची सूत्रे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सर्व वाहने गडाच्या पायथ्यापाशीच अडवली जाणार आहेत. दसरा मेळावा कृती समिती तसेच महंत समर्थक अशा दोन्ही बाजूंना पोलिसांनी शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक नोटिसा जारी केल्या आहेत.

गडावर दरवर्षी दसरा साजरा केला जातो. त्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. गडाचे महंत व विश्वस्त मंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये दसऱ्याच्या कार्यक्रमात राजकीय भाषण करण्यावर बंदी आणली, त्यातून महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. मुंडे यांनीही आपण दसरा मेळाव्याला येणारच असे जाहीर केले आहे. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमही येथील प्रशासनाला प्राप्त झाला आहे. गडावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास मनाई करणारा अर्ज महंतांनी प्रशासनाला दिला होता, त्यामुळे आता त्यांचे हेलिकॉप्टर गडाखाली एका शेतकऱ्याच्या शेतात उतरवले जाणार आहे, त्यासाठी तेथे हेलिपॅड तयार केले जाणार आहे. मुंडे यांच्यासमवेत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनीही गडावर येण्याचे जाहीर केले आहे.मेळाव्यास किमान अडीच ते ३ लाख भाविक जमा होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. मुंडे समर्थकांनी गावोगाव ‘चलो भगवानगड’ असे फलक लावून वातावरण ढवळून काढले आहे. यामुळे गड परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी आज, रविवारी दुपारी गडाच्या परिसराची पाहणी केली. तसेच गडावर जाऊन बंद खोलीत महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली. त्याचा तपशील समजला नाही, मात्र गर्दी, सुरक्षा, बॅरिकेटिंग याबाबत चर्चा झाल्याचे चौकशी करता सांगण्यात आले.

  • परिसरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. ३ पोलीस उपअधीक्षक, १२ निरीक्षक, २५ सहायक व उपनिरीक्षक, ४०० कर्मचारी, ७५ महिला पोलीस, धडक कृती दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
  • पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या जवानांची मागणी वरिष्ठांकडे केली आहे, त्यावर आज, सोमवारी निर्णय होईल.