ठाणेकरांना पुरविण्यात येणाऱ्या रस्ते, पाणी, दिवाबत्ती या प्राथमिक सुविधांसह वाहतूक व्यवस्थेवर अधिक पैसे खर्च करायचे की कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयासारख्या आरोग्य व्यवस्थांचा ‘पांढरा हत्ती’ पोसायचा, असा सवाल उपस्थित करत ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी कळवा रुग्णालयाचा गाशा गुंडाळण्याचा प्रस्ताव तयार केला आह़े त्यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
ठाणे, कळवा, मुंब््रयासह आसपासच्या शहरी भागातील गरीब रुग्णांचे आधारवट समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, असा आरोग्य सेवेचा सगळा भार राज्य सरकारने आपल्या खांद्यावर घ्यावा, अशा स्वरुपाचा प्रस्ताव गुप्ता यांनी तयार केला आहे. विशेष म्हणजे, कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य विभागाचे मंत्रीपद येताच हा प्रस्ताव पुढे दामटण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आह़े
आर्थिक भार सोसवेना
राज्य सरकारने स्थानिक संस्था करप्रणाली लागू केल्यापासून ठाणे महापालिकेपुढे आर्थिक आव्हाने उभी राहिली असून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ठाण्यातील बहुतांश व्यापऱ्यांनी एलबीटीचा भरणा केला नसल्याचे चित्र आहे. महापालिकेमार्फत कळवा येथे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालय, महाविद्यालय तसेच परिचर्या संस्थेसाठी येत्या वर्षभरात सुमारे ११० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च केल्यास ठाणे शहरातील इतर विकास कामांवर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती आयुक्तांनी व्यक्त केली आहे. मोठी अद्ययावत रुग्णालये सुरू करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा भार घ्यावा, असा आयुक्तांचा प्रस्ताव आह़े