ठाणे, कळवा व मुंब्रा या तीन शहरांमधील बेकायदा तसेच अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचे येत्या सात दिवसांत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेणार असून बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डर व जमीन मालकांविरोधात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी मुंब्रा येथे लकी कम्पाऊंड इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर शहरातील बेकायदा व धोकादायक इमारतींच्या मुद्दय़ावरून वादंग सुरू झाले होते. त्यापैकी काही इमारती महापालिकेने जमीनदोस्तही केल्या. मात्र, त्यानंतर धोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न गेले वर्षभर प्रलंबित होता. पावसाळा तोंडावर येताच पालिका प्रशासनाला जाग आली असून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
असीम गुप्ता यांच्या दालनात गुरुवारी जिल्ह्य़ातील शासकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करणे, धोकादायक इमारतींची यादी तयार करून पुढील सात दिवसांत तेथील रहिवाशांना स्थलांतरित करण्याविषयीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिका शाळांचे सुरक्षा परीक्षणही करण्यात येणार असून ज्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत त्यांना १५ जूनपर्यंत सील ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला.