तंबाखूबंदीच्या पाश्र्वभूमीवर प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यता
एसटी आगारात पानटपरीवर तंबाखुजन्य पदार्थाना बंदी घालण्यात आल्याने आर्थिक तोटा सहन करणाऱ्या पान टपरीधारकांना पाकीटबंद खाद्यपदार्थाची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात पानटपरीवर तंबाखुजन्य पदार्थाऐवजी पाकीटबंद खाद्यपदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने परवानगी दिल्याने लवकरच एसटी आगारातील पानटपरीवर तंबाखू पदार्थवगळता बिस्किट, वेफर्स, चॉकलेट आदी पदार्थ मिळणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यभरात एसटीचे एकूण २५२ आगार आहेत. यातून रोज १८ हजार बस गाडय़ा सोडण्यात येत असून, या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७० लाखांच्या घरात आहेत. यातील किमान ८-१० टक्के प्रवाशांकडून तंबाखुजन्य पदार्थाची खरेदी केली जाते. त्यामुळे अनेक वेळा एसटीच्या बस गाडय़ांत आणि आगारातील भिंतीवर तंबाखुजन्य पदार्थाच्या पिचकाऱ्या आणि सिगारेटची थोटके दिसून येतात. त्यामुळे एसटी आगारांसह बस गाडय़ाही अस्वच्छ होत असल्याने ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’कडून आगारातील पान टपरीधारकांना तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी घालण्यात आली होती.
या निर्णयाचा फटका पान टपरीधारकांना बसत असल्याने राज्य पान स्टॉल परवानाधारक संघटनांनी राज्य सरकार आणि महामंडळाला पान स्टॉलधारकांना पर्यायी व्यवसाय देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पानटपरीधारकांना परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पानटपरीधारकांना बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय शिजवलेले कोणतेही खाद्यपदार्थ न विकता पाकीटबंद वस्तूंची विक्री करण्याची मुभा देण्यात आल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

एसटी आगारात पानटपरीधारकांना तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याच धर्तीवर संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना पाकीटबंद वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात शिजवलेल्या खाद्यपदार्थाची विक्री त्यांना करता येणार नाही.
-रणजितसिंग देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक