‘जीएसटी’ अंमलबजावणीसाठी रात्री साडेअकरापर्यंतच व्यवहार

शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभर लागू होत असलेल्या वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) प्रक्रियेसाठी शुक्रवारी रात्री साडेअकरानंतर मुंबईतील बहुतांश उपाहारगृहे आणि रेस्तराँ बंद करण्यात येणार आहेत. शनिवार, रविवारच्या सुटीमुळे शुक्रवारी मुंबईतील उपाहारगृहांत मध्यरात्रीनंतरही गजबज असते. परंतु, शुक्रवार ३० जूनची रात्र त्याला अपवाद ठरणार आहे.

शुक्रवारी मध्यरात्री १२नंतर जीएसटीचे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केल्यानंतर सर्वच क्षेत्रांमध्ये या कराच्या अमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘जीएसटी’ नियमांनुसार वातानूकूलित नसलेल्या उपाहारगृहांतील जेवणावर १२ टक्के, वातानुकूलित उपाहारगृहांत १८ टक्के व पंचतारांकित हॉटेलांनाही १८ टक्के कर लागू करण्यात आला आहे.

जीएसटी लागू करण्यासाठी उपाहारगृहांना आपल्या बिलिंग यंत्रणांमध्येही बदल करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ७ हजार उपाहारगृहे शुक्रवारी रात्री बाराच्या आधी बंद होणार आहेत. मद्यविक्री केल्या जाणाऱ्या रेस्तराँची संख्या यात अधिक आहे. ‘जीएसटीनुसार सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याकडील दारूचा साठय़ाची नोंद नवीन यंत्रणेत करावी लागणार आहे. यासाठी बराच वेळ लागणार असल्याने या रेस्तराँमध्ये रात्री ११.३० वाजता शेवटची ऑर्डर घेतली जाईल,’ असे राज्यातील ‘आहार’ या उपाहारगृह मालक संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले.

चर्चगेट येथील ‘बिअर कॅफे’ शुक्रवारी रात्री साधारण १२.३० ते १.०० वाजेपर्यंत सुरू असतो. या कॅफेत कायमच गर्दी असते. शुक्रवार-शनिवार या दिवशी संध्याकाळनंतर ग्राहकांचे प्रमाण जास्त असते. मात्र ३० जून रोजी हा कॅफे ११.३० पर्यंत सुरू राहणार आहे, असे येथील व्यवस्थापकाने सांगितले. दादर येथील ‘शेर-ए-पंजाब’ या रेस्तराँ बारमध्ये तांत्रिक सुधारणा करून घेण्यात आल्या असल्या तरी, नवीन यंत्रणेत घोळ होण्याची शक्यता गृहित धरून याठिकाणीही १२नंतर ग्राहकांचे व्यवहार बंद करण्यात येतील, असे या बारचे मालक त्रिभूवनलाल गांधी यांनी दिली. दादरच्या ‘आस्वाद’ उपाहारगृहात जीएसटीसंदर्भातील तांत्रिक बदल शुक्रवारी सकाळीच करण्यात येणार आहे. हे उपाहारगृह पूर्णत: शाकाहारी असल्याने केवळ संगणकावर तांत्रिक बदल करावा लागेल. यासाठी साधारण १ ते दीड तासांचा वेळ पूरेसा आहे, असे या उपहारगृहाचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी सांगितले.

पंचतारांकित हॉटेलांमध्ये मात्र तांत्रिक सुधारणा करण्यात आली असून शुक्रवारीही रात्री उशिरापर्यंत हॉटेल खुली राहणार आहेत, असे पंचतारांकित हॉटेल संघटनेचे प्रमुख दिलीप दातवानी यांनी सांगितले. मुंबईत १५ हून अधिक पंचतारांकित हॉटेल आहेत तर सुमार १००० हॉटेल हे प्रथम श्रेणीमध्ये येतात. जीएसटी सुरू झाल्यानंतर काही दिवसात हॉटेलांच्या किंमती वाढविण्यात येईल. परप्रातांतून येणाऱ्या मालावर जास्त जीएसटी असल्याने ही वाढ करण्यात येईल, असेही दातवानी यांनी सांगितले.