मुंबईत सर्वत्रच बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत आहे. मरिन ड्राइव्ह परिसरात मोटारसायकलस्वारांच्या गाडय़ा हाकण्यामुळे सामान्य नागरिकच नव्हे, तर त्यांना रोखण्यासाठी तनात करण्यात आलेल्या पोलिसांचे जीवितही धोक्यात आले आहे. याविषयी वाहतूक पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) अनिल कुंभारे यांच्याशी केलेली बातचीत.

अनिल कुंभारे, वाहतूक पोलीस उपायुक्त

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

* मुंबईत सर्वत्रच बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठल्या मार्गावर ही समस्या अधिक दिसून येत आहे?
वेगाने गाडय़ा हाकण्याचे, सिग्नल न जुमानण्याचे प्रमाण दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट या दरम्यान सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. एन. एस. मार्गावर मोटारसायकलस्वार वेगाने आपल्या गाडय़ा दामटवत जाताना दिसतात. कधी एकटादुकटा मोटारसायकलस्वार तर कधी समूहाने गाडय़ा हाकणारेही दिसून येतात. आम्ही केलेल्या कारवाईत आढळून आलेले मोटारसायकलस्वार किंवा कारचालक हे तरुणच आहेत. त्यातही उपनगर किंवा नवी मुंबई, ठाणे परिसरातून ही तरुणाई वेगाची िझग घेऊनच दक्षिण मुंबईत पोहोचते. रात्री सिग्नल बंद झाल्यानंतर अशा घटना मोठय़ा संख्येने घडतात. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने अशा मोटारसायकलस्वार-कारचालकांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे.
’ अशा प्रकारे स्वतच्या आणि दुसऱ्याच्या जिवाला धोका पोहोचवणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस काय कारवाई करतात?
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत त्यांच्याकडून १०० रुपयांचा दंड वसूल करते. वाहनचालकाने मद्यपान केले असेल तर दंड किंवा शिक्षेत वाढ होते. गेल्या काही महिन्यांत अशा घटना घडणारे प्रमुख नाके, सिग्नल या ठिकाणी वाहतूक पोलीस स्थानिक पोलिसांच्या साथीने नाकाबंदी करत आहेत. वाहनाचा वेग जास्त असेल, माíगका बदलत गाडय़ा चालवल्या जात असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. परंतु, कारवाईची रक्कम पाहता त्याला फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ई-चलान ही योजना वाहतूक विभाग लवकरच राबविणार असून त्या माध्यमातून सतत एकच अपराध करणाऱ्यांच्या दंडात-कारवाईत वाढ होण्यास वाव आहे. सतत बेदरकारपणे वाहन चालवीत असलेल्या वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्याबरोबरच गाडी जप्त करणे आणि प्रसंगी तुरुंगवासही शक्य आहे. त्यामुळे, या प्रकारांना लवकरच चाप बसेल. जर नागरिकांना कायदा समजत नसेल तर तो समजावून देण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे.
* वेगाची झिंग चढलेल्या वाहनचालकांमुळे नागरिक आणि पोलिसांच्या जीविताला धोका असतो. त्याला आवर कसा घालणार?
ताशी १०० किलोमीटर वेगाने मोटारसायकल किंवा कार चालविणाऱ्या वाहनचालकाच्या आड तुम्ही आलात तर तुमचे काय होईल हे सांगण्याची गरज नाही. रात्री-अपरात्री रस्ता ओलांडताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, इतकेच आम्ही सांगू शकतो. या वाहनचालकांना रोखण्यासाठी नाकाबंदी करून उभ्या असलेल्या पोलिसांनाही स्वतच्या जीविताचे रक्षण करून कर्तव्य बजावण्यास आम्ही सांगतो. गेल्या काही महिन्यात नाकाबंदीवर असलेल्या वाहतूक-स्थानिक पोलिसांना अशा गाडय़ांनी धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. नाकाबंदी झुगारून पळून गेलेल्या मोटारसायकल-कार यांचा वाहन क्रमांक टिपल्यास किंवा सीसीटीव्ही चित्रीकरणातून क्रमांक मिळवून दोषींना पकडणे सहजशक्य आहे, परंतु, वेगातील गाडीने उडविल्यास होणारी जीवित हानी भरून काढणे शक्य नाही.
* दक्षिण मुंबईतील जेजे उड्डाण पूलही वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी आहे. कितीही बंदोबस्त लावला तरी मोटारसायकलस्वार या पुलाचा वापर करताना दिसतात.
खरंय. जेजे उड्डाण पूल हा मोटारसायकलस्वारांसाठी नाही. त्यांना महात्मा फुले मंडई, मोहम्मद अली मार्ग करत उपनगराच्या दिशेने जाण्याच्या सूचना देण्यात येतात. पण, अनेक जण या सूचना ऐकतच नाहीत. झटपट प्रवासाच्या नादात जेजेवरून जाण्याचा धोका मोटारसायकलस्वार पत्करतात. पोलीस देत असलेल्या सूचनांचा सन्मान केला नाही तर त्याने स्वतच्या आणि दुसऱ्याच्या जिवाला धोका होणे अटळ आहे. त्यामुळेच मोटारसायकलस्वारांना उड्डाण पुलावर जाण्यापासून रोखण्यासाठी किमान चार हवालदारांचा बंदोबस्त पुलावर सतत ठेवावा लागतो. एखाद्या बसच्या अथवा मोठय़ा वाहनाच्या आडून मोटारसायकलस्वार जेजे पुलावर भरधाव वेगात जातात. अशावेळी त्यांना अडविण्याऐवजी दुसऱ्या टोकाला असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून मोटारसायकलस्वाराला पकडण्यात येते. पण, कार्यालये भरणे-सुटण्याच्या वेळात असे केल्यास इतर वाहनांचा खोळंबा होतो. त्यामुळे कधी कधी असे मोटारसायकलस्वार निसटतात.
* दक्षिण मुंबईचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या पूर्वमुक्त मार्गावरही मोटारसायकलस्वारांचा राबता दिसून येतो, त्याला आवर कसा घालणार ?
पूर्वमुक्त मार्गावर मोटारसायकलस्वारांचा प्रवेश वाहतूक पोलीस मुळीच खपवून घेत नाहीत. असे मोटारसायकलस्वार आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. मार्गावर दिसणारे मोटारसायकलस्वार हे पकडल्यानंतर आपण मुक्त मार्गाला लागून असलेल्या वस्तीत इमारतीत राहतो असे सांगतात, आपल्या कृतीचे समर्थन करतात. पण, अशा मोटारसायकलस्वारांना ६०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मुक्त मार्गावर सीसीटीव्हींचे जाळे असल्याने त्यांचे वाहन क्रमांक टिपूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मुक्त मार्गावर आणखी कडेकोट बंदोबस्त करण्यासाठी काही योजना असून लवकरच त्यावर काम सुरू होणार आहे.