वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; दुचाकीस्वाराच्या नियमभंगाचा भलत्याच व्यक्तिला फटका

रिक्षाचालकाने हेल्मेट न घातल्याने त्याच्याकडून वाहतूक पोलिसांनी चक्क पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. दोन दिवसांपूर्वी चुनाभट्टीतील एका रिक्षाचालकावर चेंबूर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मुंबई शहरात वाहतूक पोलिसांनी ई-चलन सुरू केले आहे. सिग्नलवर असताना एखादा नियम मोडल्यास तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या सीसी टीव्हीमध्ये ती घटना कैद होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून संबंधित वाहनचालकांना दंड भरण्यासाठी घरपोच पावती मिळते. अनेकदा वाहनचालक ही दंडाची रक्कम भरण्यासाठी जात नसल्याने नाकाबंदी अथवा सिग्नलवर ही वाहने आढळून आल्यावर वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात.

अशाच प्रकारे चुनाभट्टीत राहणारे शंकर थळे हे रिक्षाचालक मंगळवारी घाटकोपर येथून शीवच्या दिशेने जात असताना सुमन नगर जंक्शनवर त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यांच्यावर एकूण एक हजार नऊशे रुपये दंड असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. थळे यांनी कशीबशी दंडाची रक्कम भरून रिक्षा सोडवली. सिग्नलवर असताना कधीतरी ‘झेब्रा क्रॉसिंग’ झाले असावे या विचाराने हा दंड झाला असावा, असा त्यांचा समज झाला. मात्र पैसे भरल्यानंतर त्यांना मिळालेल्या पावतीवर वाहनचालक परवाना नसल्याने पाचशे रुपये, हेल्मेट न घातल्याने पाचशे रुपये आणि दोन वेळा सिग्नल तोडल्याने नऊशे रुपये दंड झाला असल्याचे त्यांना समजले.

थळे यांनी ही बाब रिक्षाचालकांच्या संघटनेकडे नेली. रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांची भेट घेऊन अधिक तपासणी केली असता एका दुचाकीस्वाराचा दंड थळे यांच्या माथी मारला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर संतापेल्या रिक्षाचालकांनी बेजबाबदार वाहतूक पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, चेंबूरचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक संजय खताळे यांनी मात्र,  अशा प्रकारची कुठलीही चूक झाली नसल्याचे म्हटले आहे. एकाच क्रमांकाची दोन वाहने?

ज्या दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे वाहतूक पोलिसांनी थळे यांना दंड ठोठावला, त्याच्या मोटारसायकलीचा आणि थळे यांच्या रिक्षाचा नंबर एकच असल्याचे पोलिसांकडील सीसीटीव्ही चित्रणावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ती दुचाकी एकतर चोरीची तरी असू शकते किंवा परिवहन विभागाकडून दुचाकी आणि रिक्षाला एकच नंबर दिला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.